आदर्श शिक्षक हंबीरराव कांबळे यांना अनोखी श्रद्धांजली.
आदर्श शिक्षक हंबीरराव कांबळे यांना अनोखी श्रद्धांजली.
पर्यावरणपूरक अंत्यसंस्कारासह २०० पुस्तकांचे वाटप
शिराळा- प्रतिनिधी.
मांगले ता.शिराळा गावचे सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक तथा सामाजिक कार्यकर्ते हंबीरराव शंकर कांबळे (वय ८३) यांचे दि. २९ जुलै रोजी गुरु पौर्णिमेच्या दिवशी पहाटे ५.४५ वाजता निधन झाले. त्यांच्या निधनाने शिक्षण, सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रात हळहळ व्यक्त होत आहे.हंबीरराव कांबळे यांनी शिक्षक म्हणून कार्यरत असताना आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना स्वतःच्या खर्चातून वह्या, पुस्तके आणि कपडे उपलब्ध करून दिले. तसेच गुणवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती परीक्षांसाठी कोणताही मोबदला न घेता अतिरिक्त मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाचा लाभ घेतलेले अनेक विद्यार्थी आज विविध शासकीय विभागांमध्ये क्लास-१ व क्लास-२ अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.शिक्षणाबरोबरच त्यांना सामाजिक कार्याची विशेष आवड होती. ते उत्कृष्ट कबड्डीपटू होते. जिल्हास्तरीय कबड्डी स्पर्धांमध्ये त्यांनी अनेक पारितोषिके मिळवून आपल्या गावाचा गौरव वाढविला.त्यांच्या निधनानंतर कुटुंबीयांनी पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत त्यांच्या अस्थी नदीत विसर्जित न करता शेतात वृक्षारोपण केले. तसेच पारंपरिक प्रथा-परंपरांना फाटा देत समाजात वाचन संस्कृती रुजावी या उद्देशाने "वाचाल तर वाचाल, नाहीतर भंगारात फेकाल" हा संदेश देत ज्येष्ठ विचारवंत गोविंद पानसरे लिखित "शिवाजी कोण होता?" या पुस्तकाच्या २०० प्रती उपस्थितांना मोफत वितरित करण्यात आल्या.ज्ञानदान, समाजसेवा, क्रीडा आणि पुरोगामी विचारांचा वारसा जपणारे हंबीरराव कांबळे यांच्या कार्याची आठवण त्यांच्या विद्यार्थ्यांसह परिसरातील नागरिकांनी कृतज्ञतेने व्यक्त केली.यावेळी राष्ट्रीय काँग्रेसचे तालुकाध्यक्ष ॲड.रवी पाटील,मांगले गावचे सरपंच प्रल्हाद पाटील, संचालक संदीप तडाखे,बहुजन समाज पार्टीचे वैभव वाघमारे, राहुल पवार, संतोष उत्तरकर, माजी सरपंच राहुल पवार, भारतीय बौद्ध महासभेचे बौद्धाचार्य सचिन कांबळे, ॲड. अमित एटम,कांबळे कुटुंबीय, नातेवाईक उपस्थित होते.


Comments
Post a Comment