"ब्रेक द चेन"च्या काळात वाढती साठेबाजी, महागाई ..

 "ब्रेक द चेन"च्या काळात वाढती साठेबाजी, महागाई ..

दक्षिणमांड तिरावरुन_______

 "ब्रेक द चेन" कोरोना महामारीच्या काळात सुरू असलेल्या लॉकडाऊनमुळे जीवनावश्यक वस्तूंचे दर गगनाला भिडले आहेत. अनेक ठिकाणी छुप्यापद्धतीने चढय़ा दराने वस्तूंची विक्री सुरु आहे. मागील वर्षीच्या  लॉकडाऊनमुळे अगोदरच रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला असून हातात पैसे नाहीत आणि त्यात महागाईचा भडका यामुळे सामान्य नागरिक मेटाकुटीला आला आहे. अशावेळी महागाईला रोखणार कसे?  सरकारच्या दुर्लक्षामुळे महागाई वाढत असल्याचे सांगत साठेबाजी करणा-या व्यापा-यांवर कठोर कारवाई होण्याची गरज निर्माण झाली आहे.


अशा व्यापा-यांवर कडक कारवाई व्हावी..

  देशासह राज्यात निर्माण झालेल्या  महामारी संकटाचा लाभ घेत काही दुकानदार चढय़ा भावाने वस्तूंची विक्री करत आहेत. गृहोपयोगी, जीवनावश्यक वस्तू जनतेला खरेदी करणे   आवश्यकच असतात हे ओळखूनच काही दुकानदार संकटाच्या  परिस्थितीत वस्तूची टंचाई असल्याचे सांगून  गैरफायदा घेत आहेत. सरकार म्हणते जीवनावश्यक वस्तूंचा साठा मोठय़ा प्रमाणात असून त्याचा पुरवठाही दुकानदारांना होत आहे.पण दुकानदार मात्र माल येत नसल्याचे सांगून काळ्या बाजाराने विक्री करत आहेत. एकतर देशात १४ महिने टाळेबंदी लागू आहे त्यामुळे लोकांचे रोजगार बुडाले असल्याने खिशात पैसे नाहीत. असे असताना  दुकानदार, भाजी विक्रेते चढय़ा दराने माल विक्री करून जनतेला नडत आहेत. त्यांना सरकारी कायद्याचा धाक नाही. पण सामान्या नागरिक मात्र सद्या महागलेल्या दराने विकत घ्याव्या लागत असलेल्या वस्तूच्या किमतीमुळे कोलमडून पडला आहे. घरकुटुंब चालविणे कठीण झाले आहे. त्यांना सरकारने दिलासा देण्याची गरज आहे. त्यांना स्वस्त दरात जीवनावश्यक वस्तूची गरज आहे, म्हणूनच राज्य सरकारने जीवनावश्यक वस्तूच्या किमतीवर नियंत्रण आणण्यासाठी व साठेबाजी करून काळा बाजार करणार्यांना रोखण्यासाठी ठोस उपाययोजना आखावी सरकारने निश्चित केलेल्या दराने तसेच छापील किमतीतच वस्तू विक्री करणे दुकानदार, विक्रेत्यांना   बंधनकारक करावे व त्या पेक्षा जास्त दराने विक्री करण्यावर साठेबाजी करणार्यांवर तातडीने धडक  कारवाई करून राज्यातील जनतेला दिलासा द्यावा.


ग्राहक व व्यापारी समन्वय..

   नैसर्गिक आपत्ती ओढवली की, रिक्षा, टॅक्सी, खासगी वाहतूक करणारे व्यावसायिक, व्यापारी कि विक्रेते असे उद्योगधंदे करणारी सर्वच मंडळी आपल्यातील माणुसकी विसरून संधीचा फायदा कसा उठविता येईल? असा विचार मनात तयार असतो. त्यांना खरतर जाणीव झालेली असते कि, आजच्या घडीला माणसं हतबल झालेली आहेत. यामुळे या परिस्थितीत आमच्यावर अंकुश ठेवायला कोण येणार? मग हीच ती वेळ आहे? कोणत्याही प्रकारे मुलाहिजा न ठेवता राजरोस लूटमार करून घ्यायची ती सुद्धा परवाना मिळाल्यागत आजच्या घडीला सर्वच कोरोना महामारीचे संकट उद्भवले. पण वरपासून खालपर्यंत सर्वजण यात हात धुवून घेत आहेत. त्यात व्यापारी तरी मागे कसे असतील? एक तर नोटबंदी, जीएसटी यामुळे कंबरडे मोडलेले आहे. यात झालेले नुकसान भरून काढण्यासाठी व्यापार्यांनी याचा फायदा करून घेण्याचे ठरविले आहे. व्यापार्यांनी ग्राहकांची अडवणूक करायची असे आडमुठे धोरण स्वीकारले असून दुकानातील मालाचा साठा गायब करून ठेवणे आणि आवश्यक मालपुरवठा होत नसल्याची आवई उठवायची, असा जणू खेळ एजंट व व्यापारी यांच्यात सुरु आहे. हि मुळात साखळी असून ती तोडण्याची गरज आहे. व्यापा-याना राजकीय वरदहस्त लाभल्याने वाढत्या महागाईला रोखणे कठीण आहे. पण इच्छाशक्ती असल्यास ते शक्य आहे. शासनकर्त्यांनी व्यापारी उपाय योजना म्हणून लूटमार प्रतिबंध करणारी समिती नियुक्त करावी. त्यातून धडक पथके तयार करण्यात यावी. ज्यावेळी अशी आपत्ती उद्भवेल त्यावेळी त्यांनी पंचनामा करून तात्काळ कारवाई करताना शिक्षेची तजवीज असावी. प्रथम कायम स्वरूपी दुकाने सील करणे, परवाना रद्द करणे अशाप्रकारे कडक निर्बंध लावण्यात आल्यास छुप्या पद्धतीने आणि चढय़ा दराने सामानाची विक्री करण्याची सवय मोडेल, तरच हे व्यापारी भानावर येतील. प्रेताच्या टाळूवरचे लोणी खाणारे कमी नाहीत. खरेपणाने व्यवसाय केल्यास आणि वस्तूंचे दर नियंत्रणात ठेवल्यास ग्राहक हाच देवो भव असे समजून प्रामाणिकपणे वागल्यास थोडय़ा फार प्रमाणित महागाई रोखणे सहज शक्य आहे. 


सरकारने ठोस पावले उचलावीत


राज्यात"ब्रेक द चेन"चे लॉकडाऊनचे सत्र सुरु झाले असुन सर्वसामान्याचे जनजीवन विस्कळीत झाले. घरी राहा आणि सुरक्षित राहाच्या नियमामुळे लोक घरी अडकून पडले. कार्यालयं, उद्योग बंद झाल्याने बेरोजगारीची समस्या तीव्र झाली. लॉकडाऊनमुळे खाजगी क्षेत्र अडचणीत आल्याने तेथे काम करणार्यांवर बेरोजगार होण्याची पाळी आली आहे. लॉकडाऊनची झळ बसल्यामुळे रस्त्यावरचे लहानमोठे व्यवसाय, सलून, व्यायामशाळा, बांधकाम व्यवसाय, पर्यटन, हॉटेल्स, मॉल्स इत्यादी मधील कामगारांवर बेकार होण्याची आफत ओढवली आहे. दुर्दैवाची गोष्ट म्हणजे अशाही गंभीर परिस्थितीत खासगी हॉस्पिटल्सनी भरमसाठ बिले लावून वाहत्या गंगेत हात धुवून घेतले. वीज कंपन्यांनी बिले वाढवून दिली. काही महाभागांनी मागच्या दाराने चढय़ा भावाने दारूची विक्री केली. किरकोळ भाजीवाल्यांनी भाज्यांचे भाव वाढविले. सर्वात कहर इंधनाचे भाव वाढवून पेट्रोल कंपन्यांनी केला. पेट्रोल-डिझेलमुळे सर्वच वस्तूंचे दर वाढत जातात. महागाई रोखण्यासाठी सर्वप्रथम सरकारने पेट्रोल-डिझेलच्या किमती कमी करणे गरजेचे आहे. त्यासाठी केंद्र सरकारने आणि राज्य सरकारांनी इंधनावरचे विविध कर कमी केले पाहिजेत. दुसरी गोष्ट म्हणजे अशा परिस्थितीचा गैरफायदा घेऊन वस्तूंची साठेबाजी करून कृत्रिम टंचाई निर्माण करणार्यांवर कठोर कारवाई करणे गरजेचे आहे. सध्या सरकारचे लक्ष पूर्णपणे कोरोनाची महामारी आटोक्यात आणण्यावर केंद्रित झाले आहे. मात्र असे असले तरी सरकारने मनावर घेतले तर काही तातडीच्या उपाय योजना करून महागाई आटोक्यात येऊ शकते. 


साठेबाजी रोखून रास्तभावात विक्री करावी..


कोरोनाच्या महामारीमुळे जीवितहानी होऊ नये म्हणून काटेकोर पणे लॉकडाऊन पाळावा लागत असुन सर्वसामान्य ते ही मरणाच्या भितीने पाळतील मात्र त्याचा परिणाम नोक-या उद्योगधंदे यांच्यावर गंडांतर आले. लॉकडाऊन च्या पार्श्वभूमीवर सर्व उत्पादन क्षेत्र  बंद आहेत. उत्पादन नाही, मालाचा तुटवडा ह्याचा गैरफायदा ज्यांनी गोदामे भरून ठेवली आहेत तेच व्यापारी दुप्पट भावाने तोच ठेवणीतला माल जनतेला विकून त्यांच्या आवश्यक गरजेचा फायदा उचलताना दिसतात. सरकारने गोडावून आणि साठा केलेल्या जागेवर छापा मारून सदर माल ताब्यात घेऊन जनतेला रास्त भावात मिळावा यासाठी विभागवार स्वतंत्र यंत्रणा उभी करावी. आर्थिक संकट संपूर्ण देशावर ओढवले आहे पण त्याचा गैरफायदा व्यापार्यांनी घेणे म्हणजे मढय़ावरचे लोणी खाण्यासारखे झाले आहे. कोरोना संक्रमण  लाखोच्या वर सरकत असले तरी त्यावर मात करणार्यांची संख्याही लक्षणीय आहे. जनतेला हि आता गांभीर्य लक्षात आले आहे. सरकारने बेरोजगारीची सद्य भयावह  स्थिती पाहता लॉकडाऊन जरुरच गरजेचे आहे,मात्र छोटय़ा मोठय़ा उद्योग धंद्यांना नियम लावून सुरु करण्यास परवानगी द्यावी. जनतेच्या मागण्या व त्याला पूरक जीवनाश्यक वस्तू सुलभपणे मिळाव्यात. गरज आणि अर्थाजन याचा मेळ बसावा म्हणून काही नियम शिथिल करून दंडात्मक कारवाई न करता सहकार्याची भूमिका निभावणे गरजेचे. रोजगाराची सर्व क्षेत्रे खुली करावीत. इथे ओशाळली माणुसकी हा प्रत्यय आता येऊ नये.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .