कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न
कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे माजी विद्यार्थी मेळावा उत्साहात संपन्न
उंडाळे - प्रतिनिधी.
श्री संतकृपा शिक्षण संस्थेचे कॉलेज ऑफ फार्मसी (डी फार्म) घोगाव येथे माजी विद्यार्थ्यांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात पार पडले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून माजी विद्यार्थी तसेच सध्याचे विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून औदुंबर धांगेकर(हॉस्पिटल फार्मासिस्ट), परेश बगुल(असिस्टंट प्रोफेसर रुपेश बंधन इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी पिंपळनेर), सागर मोहिते(हॉस्पिटल फार्मासिस्ट) व अभिजीत दळवी(एरिया सेल्स मॅनेजर दवा इंडिया प्रायव्हेट लि.) हे उपस्थित होते. यावेळी परेश बगुल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना मुलांनी इतर कोणत्याही वाईट गोष्टीकडे लक्ष न देता अभ्यासात लक्ष देणे, तसेच स्वतःचे करिअर हे अत्यंत महत्त्वाचे आहे म्हणून फक्त डिप्लोमा फार्मसी न करता पुढील शिक्षण घेणे किती महत्त्वाचे आहे याविषयी मार्गदर्शन केले. तसेच औदुंबर धांगेकर, सागर मोहिते व अभिजीत दळवी यांनी सध्या शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या सध्या ते काम करत असलेल्या क्षेत्राविषयी व कार्याविषयी माहिती देऊन मार्गदर्शन केले व महाविद्यालयामध्ये शिक्षण घेत असताना स्वतःचे घडलेले महाविद्यालयातील अनुभव सांगून नव्याने या आठवणींना उजाळा दिला.
यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना विद्यार्थ्यांनी काळाबरोबर बदल करणे हे खूप गरजेचे असल्याचे सांगून जुन्या गोष्टींना उजाळा देत या माजी विद्यार्थ्यांनी संस्थेबद्दल जी भावनिक गुंतवणूक ठेवलेली आहे ती प्रेरणादायी असल्याचे सांगितले. तसेच सध्या काही विद्यार्थी फार्मसी क्षेत्रात मोठ्या पदावरती काम करीत आहेत अशा विद्यार्थ्यांचा गौरव करून पुढील वाटचालीस त्यांना शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलनाने करण्यात आली. तसेच प्रमुख पाहुण्यांचे स्वागत प्राचार्या डॉ. वैशाली पाटील यांनी केले. सूत्रसंचालन प्रा. पूजा भोसले व आभार प्रा. मोनिका शिंदे यांनी मानले.

Comments
Post a Comment