ऊस वाहतुकीसाठी सीएनजी वापरावर भर देणार : डॉ. सुरेश भोसले.

 

ऊस वाहतुकीसाठी सीएनजी वापरावर भर देणार : डॉ. सुरेश भोसले.

‘कृष्णा’चे १३ लाख ३८ हजार मे. टन गाळप; गळीत हंगामाची सांगता.

शिवनगर, ता. 02 : ऊस वाहतुकीसाठी लागणाऱ्या डिझेलऐवजी सीएनजी गॅसचा वापराकडे एक पर्याय म्हणून पाहिले जात आहे. कृष्णा कारखान्याकडून येत्या काळात सीएनजीच्या वापरावर भर दिला जाणार आहे, असे प्रतिपादन चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी केले. य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या सन २०२१-२२ च्या ६२ व्या गळीत हंगाम सांगता समारंभात ते बोलत होते. कृष्णा बँकेचे अध्यक्ष डॉ.अतुल भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.  

प्रारंभी संचालक लिंबाजी पाटील व त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. कविता  पाटील यांच्या हस्ते गळीत हंगाम समाप्तीनिमित्त श्री सत्यनारायण पूजा संपन्न झाली. यावेळी व्हा.चेअरमन जगदीश जगताप, संचालक जितेंद्र पाटील, बाबासो शिंदे, बाजीराव निकम, संभाजीराव पाटील, शिवाजी पाटील, सयाजी यादव, जे. डी. मोरे, विलास भंडारे, वसंतराव शिंदे, अविनाश खरात, कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी, बहेचे माजी उपसरपंच मनोज पाटील, वैभव जाखले, माजी प स सदस्य संजय पवार, जयसिंग माने, किरण थोरात, रेठरे बुद्रुकचे उपसरपंच शिवाजी चव्हाण,  एम. के. कापूरकर आदी उपस्थित होते.

पुढे बोलताना चेअरमन डॉ. भोसले म्हणाले, ऊस तोडणी वाहतूकदार,  कामगार व अधिकारी वर्गाने चांगले काम केले म्हणून हा गळीत हंगाम यशस्वीपणे पार पडला आहे. सर्वांनी अडचणींवर मात करत गळीत हंगाम यशस्वी करून दाखवला. येणारा हंगामही लवकर सुरू करण्याच्या दृष्टीने वाटचाल करणे आवश्यक आहे. ऑफ सिझनची कामे वेळेत पूर्ण करावी लागणार आहेत. तसेच टप्या टप्याने कारखान्यात सुधारणा कराव्या लागणार आहेत. 

डॉ.अतुल भोसले म्हणाले, कृष्णा कारखान्याने या हंगामात इतिहासातले उच्चांकी असे द्वितीय क्रमांकाचे ऊस गाळप केले आहे.  येत्या काळात कमी दिवसांत कारखान्यात विस्ताराचे काम पूर्ण करायचे आहे. त्या दृष्टीने सुरेश बाबांच्या मार्गदर्शनाखाली वाटचाल सुरू आहे. पुढील हंगामात कारखान्याने १५ लाख ऊस गाळपाचे उद्दिष्ट समोर ठेवून वाटचाल करावी. 

व्हाईस चेअरमन जगदीश जगताप म्हणाले, या हंगामात नैसर्गिक आपत्तींचा सामना करावा लागला तरीही सर्व तोडणी वाहतूकदार, कर्मचारी अधिकारी यांनी चांगले नियोजन करत उत्कृष्टपणे विक्रमी ऊस गाळप केले. 

कार्यकारी संचालक सूर्यकांत दळवी यांनी प्रास्तविकात कारखान्याच्या प्रगतीचा आलेख सादर केला. ते म्हणाले, कृष्णा कारखान्याने १८५ दिवसांमध्ये १३ लाख ३८ हजार ७५० मेट्रिक टन ऊसाचे गळीत केले असून, १४ लाख ८९ हजार क्विंटल साखर निर्मिती केली आहे. कारखान्याचा यंदाचा साखर उतारा १२.५४ टक्के इतका राहिला आहे.   शेतकरी सभासद, तोडणी वाहतूकदार, कंत्राटदार, अधिकारी व कर्मचारी यांनी हा गळीत हंगाम यशस्वी पार पाडण्यासाठी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार श्री. दळवी यांनी मानले. यावेळी ऊस तोडणी वाहतूकदार व शेती विभागाचे  कर्मचारी यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. शेतकरी सभासद, ऊस तोडणी वाहतूकदार, अधिकारी व कर्मचारी आदी  याप्रसंगी उपस्थित होते. सेक्रेटरी मुकेश पवार यांनी सूत्रसंचालन केले. संचालक जितेंद्र पाटील यांनी आभार मानले.



Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .