समाजाला तिमिरातून तेजाकडे घेवून जाणारी 'उजेडवाती'
समाजाला तिमिरातून तेजाकडे घेवून जाणारी 'उजेडवाती'
गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट:-
कवी गुलाब मोहिते यांचे कवितेतील पहिले पाऊल म्हणजे 'उजेडवाती' हा कवितासंग्रह होय. या कवितासंग्रहामध्ये एकूण ७० स्फूट कवितांचा समावेश आहे. मुखपृष्ठावर उगवणाऱ्या सूर्याबरोबर अंधःकार नष्ट करणाऱ्या किरणांचे चित्र रेखाटले आहे; सूर्योदयापासून मानवाची जगण्याची धडपड, दुःख संपुष्टात आणण्याची आस, स्व अस्तित्वाचा शोध घेण्याची वृत्ती; असा आशावादी प्रयत्न करणारा मानव सूर्याच्या दिशेने निघाला आहे.
गुलाब मोहिते यांचा कवितासंग्रह उजेडाचा किरण सोबत घेऊन अंधकारमय विश्वात प्रवेश करीत आहे. वेगवेगळे आशय आणि शीर्षक यानुसार या कवितांची रचना दिसते. वृद्धाश्रम ही पहिलीच कविता भावनिक बंध आणि बदललेला समाज यांचे वास्तव टिपते. शिक्षण नोकरी व्यवसाय या निमित्ताने नात्यातील अंतर वाढत आहे. मानवाच्या धावत्या जीवनप्रणालीमुळे नाती दुरावत चालली आहेत. आज वृद्धाश्रमांची संख्या वाढत आहे. आई-वडिलांकडे लक्ष द्यायला मुलांजवळ वेळ नाही; त्यामुळे वृद्धाश्रमांना ठराविक रक्कम देणगी स्वरूपात द्यावयाची आणि आई-वडिलांची जबाबदारी झटकून द्यावयाची अशी परिस्थिती निर्माण झाली आहे. कवितेतील मुलगा आईला भेटायला येतो तेव्हा तिचे काळीज भरून येते, पण तिला मुलाचीच काळजी वाटते. ती त्याच्या केसातून हात फिरवते आणि पोटाशी धरून हृदयाला आवर घालते. ती म्हणते, "जा बाळा वेळ होईल घरी तुझा मुलगा वाट बघत असेल. माझ्या वाट्याला आला तसा तुझ्या वाटायला नको वृद्धाश्रम" आई स्वतःला सावरते आणि मुलाला म्हणते, " मी जे दुःख भोगले ते तुझ्या आयुष्यात नको तुला तुझ्या कुटुंबाचा सहवास लाभू दे." अशी इच्छा व्यक्त करते. या कवितेवरून असं जाणवते की, मानवाला आपल्या संस्कार मूल्यांचा विसर पडला आहे. याच आशयाची शेवटची कविता म्हणजे 'माणूसपण गोठलंय' ही मूल्य ऱ्हासाची कविता आहे.
'प्रदर्शन' या कवितेमध्ये मानवी जीवनातील दिखाऊपणा आणि आभासी जग यांचा उल्लेख दिसतो. मानवाने आपल्या मेंदूच्या जीवावर प्रगती केली पण मानवी हृदय मात्र संकुचित केले. मानव हा स्वार्थी बनत आहे. माणुसकीची नीतीमूल्ये हरवत चालल्याची खंत या कवितेच्या केंद्रस्थानी आहे. 'अतिथी देवो भव' ही संकल्पना लुप्त होण्याच्या मार्गावर आहे. घरामध्ये वस्तूंची रेलचेल आहे. पण माणसांची वर्दळ नाही. मनुष्याला चौकोनी कुटुंबाचा हव्यास आहे. घरी आलेल्या व्यक्तीचा पाहुणचार करण्यापेक्षा मी किती मिळवलं याचे प्रदर्शन करणारी ही कविता आहे.
या संग्रहातील काही कविता या बापाविषयी लिहिल्या आहेत . 'बाप माझा साधाभोळा' या कवितेतून काबाडकष्ट करणारा शेतकरी, मुलांसाठीची तगमग आणि लुबाडणारा सावकार याचे वर्णन शेतकऱ्याचा मुलगा करतो . मातीशी टक्कर देताना बापाची माती झाली अन्नपाण्याची तमा न बाळगता माझा बाप शेतामध्ये उन्हातान्हात राबराब राबतो. त्याने फक्त हिरव्यागार पिकांचे स्वप्न पाहिले. डोक्यावर कर्जाचा डोंगर झाल्यामुळे त्याच्या आयुष्याची झोप उडाली होती चिंताग्रस्त बापाला सावकाराने लुबाडले. त्यामुळे माझ्या साधा भोळा बापाने जीवनातील सुख कधी पहिलेच नाही.असे मुलगा म्हणतो. 'बाप रडे काळजात' कवितेमधून लेक सासरी जात असताना त्याचे डोळे स्तब्ध असतात. पण काळीज व्याकुळ होऊन रडत असते . 'लेक माहेरला येते' त्यावेळची बापाची आवस्था अशा काही कविता या बापाविषयी लिहिल्या गेल्या आहेत.
'धडपड' या कवितेतून शेतकरी जरी संकटात सापडला तरी आशावादी भूमिकेतून तो उभा राहतो, याचे वर्णन कवीने केले आहे. अतिवृष्टी महापूर यामुळे पिकांचे नुकसान झाले. निसर्गाने अवकृपा केली. याची दाद शेतकऱ्यांने कुणाकडे मागावी आणि शेतकऱ्याची ही तक्रार कुणी ऐकून घेईल का ? असा प्रश्न कवी विचारतात. निसर्ग कोपल्यामुळे शेतकऱ्याच्या डोळ्यातून दुःखाचा पूर वाहत आहे. कर्जाचा भार डोक्यावर आहे. तरी पण शेतकरी जिद्दीने पुन्हा उभा राहण्याचा प्रयत्न करत आहे. पुढील सुगीचे स्वप्न पहात आहे. अशी आस मनाशी धरून शेतकरी जगत आहे .
स्त्री जीवनावर प्रकाश टाकणाऱ्या काही कविता या संग्रहामध्ये आहेत. त्यामध्ये 'समजून सांग बाई ' या कवितेमध्ये स्त्रीला सन्मानाची वागणूक द्या, तिला संकटाशी सामना करायला शिकवा, तिला समाजात धाडसीपणाने वागायला शिकवा 'एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीला समजून घेतले पाहिजे असा विचार कवी या कवितेतून व्यक्त करतात. 'बाई' या कवितेमधून स्त्रीने स्वतःला कमजोर समजू नये. आयुष्याला टक्कर देताना रडत बसू नये. येणाऱ्या काळाला सामोरे गेले पाहिजे. संकटाशी झुंज दिली पाहिजे. असा उपदेश या कवितेतून दिसतो. 'ज्वारभरातील पोर' , 'डोळ्यात जरा पहा ', 'ती ', 'प्रवास', 'मैत्रिणी' , 'तुझ्या केसात मोगरा' अशा शीर्षकाच्या काही कविता स्त्री जीवनावर आधारित आहेत. तसेच आई विषयी काही कविता लिहिल्या गेल्या आहेत. 'आई', 'आई तुझ्या मनतेची', 'कधी येणार आई' यासारख्या कवितेतून आईची थोरवी वर्णन केली आहे . 'चाळ 'या कवितेतून लावणी कलाकार स्त्रीचे भावविश्व रेखाटले आहे .
'दुखावल्या पायाला जड झाला चाळ
वेदनांचे डंक जहरी फुटके कपाळ
रोज नवे गाव आणि रोज नवा डाव
पुजलेत काळजाला रोजचेच नव्हे घाव '
सादरीकरणातून लोकांचे मनोरंजन करणे, हे लावणी कलाकारांचे कार्य पण लोकांना आनंद देत असताना; या व्यवसायात काम करत असताना मनातील दुःख वेदना या हृदयात बंदिस्त कराव्या लागतात . पोट भरण्यासाठी रोज नव्या गावी जाऊन रोज संसार मांडावा लागतो. जिभेवर विस्तव ठेवून ओठांवर गोड गाणी गाऊन प्रेक्षकांना खेळून ठेवावे लागते. तसेच 'सुटत नसते दोरी ' या कवितेतून डोंबारी खेळ करणाऱ्या मुलीचे विश्व रेखाटले आहे .पोटाची भूक मिटवण्यासाठी आपल्या जीवाची परवा न करता ती आपल्या आयुष्याचा तोल दोरीवरून सावरत असते . 'या झोपडीत माझ्या' या कवितेतून गरिबी दारिद्र्यातून जगत असताना येणाऱ्या अडचणी याचा उल्लेख येतो. एका झोपडीत वास्तव्य करणारी स्त्री पावसाचे पाणी झोपडीत शिरल्यानंतर म्हणते की ,
'या झोपडीत माझ्या तुला काय आवडले
कशासाठी हट्ट तुझा तू तिलाच निवडले '
असा प्रश्न पावसाच्या पाण्याला विचारते त्यातून तिचा जीवनाविषयीचा क्रोध , राग न जाणवता परिस्थितीला सामोरे जाताना असहाय्यतेची भावना जाणवते .
'कविता म्हणजे व्हावी' , 'माझी कविता' या कविता जीवनातील कवितेचे स्थान अधोरेखित करतात. मनातल्या जखमेवरची दवा असते कविता,
अनुभवाने ठरलेल्या खवा असते कविता
काळोख्या वाटेवरचा दिवा असते कविता.
असे कवितेविषयीचे विचार कवी मांडतात. या कवितासंग्रहातील बहुतांश कविता या समाजातील बदलती जीवनशैली आणि शेतकरी जीवनावर आधारित आहेत .या कवितासंग्रहामध्ये मनोरंजन करणाऱ्या ही काही कविता आहेत. 'गोष्ट एका गण्याची ' ,'लग्नाआधी' , 'बायकोचा संप ' , ' रिपोर्ट ' , ' गण्याचा संसारगाडा ' या कविता वाचकांना वेगळाच आनंद देऊन जातात.
कवी गुलाब मोहिते यांनी खेड्यात जीवन जगत असताना आपल्या अवतीभवती जाणवणाऱ्या भाविश्वाला कवितारूप दिले आहे. या कवितासंग्रहातील कवितेचे विषय वेगवेगळे आहेत. शेतीविषयक निसर्गच्या अवकृपेबद्दल , स्त्री जीवन विषयक, मानवी मूल्य पायदळी तुडवत असल्याची खंत, आई विषयक, बाप विषयक कविता या कवितासंग्रहामधे समाविष्ट आहेत. कवितेची भाषा साधी सोपी आहे. काही कवितांची रचना ही अभंगाप्रमाणे आहे. तर काही कविता या गेय प्रकारातील आहेत. काही कविता गोष्टीवेल्हाळ आहेत. लोकगीताचा बाज असणाऱ्याही काही कविता जाणवतात. एकूण संमिश्र प्रकारची पात्रे ही कविता रंगविते. कवीने एकूणच अवतीभवतीच्या संवेदना कवेत घेण्याचा प्रयत्न केला आहे.
या कवितासंग्रहातील काही कवितांमध्ये उत्तम कवितेच्या पाऊलखुणा दिसतात. कवीने अजूनही मानवी मनाचा तळ शोधायला हवा. विषय केंद्राकडून आशय केंद्राकडे कविता सरकायला हवी. आशयद्रव्य सक्षम, सदृढ करण्याकडे भर द्यावा. मलपृष्ठावर कवी निफाडकर म्हणतात त्याप्रमाणे त्यांची कविता आशावादी आहे.
कवीला आता उजेडवात सापडली आहे. त्यांच्या लेखणीला भविष्यात सूर्य गवसावा याच अपेक्षा आणि शुभेच्छा !
उजेडवाती (कवितासंग्रह)
कवी- गुलाब मोहिते
परिसस्पर्श पब्लिकेशन, टाळगाव (कराड )
पृष्ठे : ८०
मूल्य : १२०/
- डॉ. प्रकाश दुकळे
देशभक्त आनंदराव बळवंतराव नाईक महाविद्यालय, चिखली.
ता. शिराळा, जि. सांगली
.jpeg)
Comments
Post a Comment