शालेय विद्यार्थ्यांना ‘इन्स्पायर मानक’ योजनेमध्ये सहभागी होण्याची १५ सप्टेंबरपर्यंत संधी.
शालेय विद्यार्थ्यांना ‘इन्स्पायर मानक’ योजनेमध्ये सहभागी होण्याची १५ सप्टेंबरपर्यंत संधी.
सातारा- प्रतिनिधी.
विद्यार्थ्यांमधील नाविन्यपूर्णता आणि कल्पकतेला वाव मिळावा यासाठी राबविण्यात येणारी ‘इन्स्पायर मानक योजना’ (INSPIRE-MANAK) शैक्षणिक वर्ष २०२५-२६ पासून अधिक व्यापक करण्यात आली आहे. यापूर्वी या योजनेत केवळ इयत्ता सहावी ते दहावीतील विद्यार्थी सहभागी होऊ शकत होते; मात्र यावर्षीपासून अकरावी व बारावीच्या विद्यार्थ्यांनाही यात समाविष्ट करण्यात आले आहे.
या योजनेचा मुख्य उद्देश देशभरातील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांमधून तब्बल १० लाख समाजोपयोगी, उपयुक्त व नाविन्यपूर्ण कल्पनांची निवड करून विद्यार्थ्यांना त्या कल्पनांचे प्रोटोटाइप व उत्पादने तयार करण्यासाठी प्रोत्साहित करणे हा आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या विज्ञानविषयक जिज्ञासेला चालना मिळून त्यांची सृजनशीलता व उपक्रमशीलता विकसित होत असते.
सदर योजने करिता सर्व शासनमान्य नोंदणीकृत शाळांमधील इयत्ता सहावी ते बारावीतील पर्यंत शिकणारे विद्यार्थी आपल्या अभिनव कल्पना सादर करण्यास पात्र असतात. प्रत्येक नोंदणीकृत शाळेला दरवर्षी पाच सर्वोत्तम कल्पना नामनिर्देशित करण्याची संधी उपलब्ध करून देण्यात येत असते. विद्यार्थ्यांचे नामनिर्देशन E-MIAS वेब पोर्टल (www.inspireawards-dst.gov.in) वरून ऑनलाइन पद्धतीने करता येते. यंदाच्या शैक्षणिक वर्षासाठी नामनिर्देशन प्रक्रिया १५ जून २०२५ पासून सुरू झाली असून, अंतिम तारीख १५ सप्टेंबर २०२५ निश्चित करण्यात आली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी व शाळांनी वेळेत नोंदणी करून या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा.
या योजनेमुळे विद्यार्थ्यांना प्रयोगशीलता तसेच समस्या सोडविण्याकरिता नाविन्यपूर्ण कल्पना विकसित करण्याची मौल्यवान संधी मिळत असते. अनेक विद्यार्थ्यांच्या कल्पना पुढे चालून उद्योग, संशोधन आणि समाजोपयोगी उपक्रमांत रूपांतरित झालेल्या उदाहरणांमुळे योजनेचे महत्त्व अधोरेखित होत असल्याची माहिती सैनिक स्कूल सातारा येथील विज्ञान प्रेमी शिक्षक श्री. शिवप्रसाद टिंगरे यांनी माध्यमांना दिली.

Comments
Post a Comment