पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये जागतिक ओझोन दिन साजरा.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये जागतिक ओझोन दिन साजरा.
सोलापूर -प्रतिनिधी.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भूशास्त्र संकुलाच्यावतीने १६ सप्टेंबर २०२५ रोजी जागतिक ओझोन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या उपक्रमातून ओझोन थराचे महत्त्व, त्याचे संरक्षण, पर्यावरणपूरक जीवनशैली आणि जनजागृती या विषयांवर विचारमंथन झाले.
कार्यक्रमाची सुरुवात संकुलाचे संचालक डॉ. विनायक धुळप यांच्या हस्ते रोपांना पाणी देऊन करण्यात आली. अध्यक्षीय भाषणात डॉ. धुळप यांनी ओझोन थराचे महत्त्व, त्यास होणारे धोके आणि त्याच्या संरक्षणासाठी आवश्यक उपाय यावर मार्गदर्शन केले. डॉ. अनिल येडगे यांनी पर्यावरणपूरक जीवनशैली अंगीकारण्याचे आवाहन केले. विद्यार्थ्यांनीही ओझोन संरक्षणाविषयी आपली मते व्यक्त केली.
या दिनाचे औचित्य साधून संकुलात ओझोन थर आणि त्याचे संरक्षण या विषयावर मार्गदर्शनपर व्याख्याने, वादविवाद स्पर्धा, डॉक्युमेंटरी प्रेझेंटेशन तसेच ओझोन संरक्षणाची शपथ अशा विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. प्रा. अक्षय चव्हाण आणि डॉ. मंगेश वेदपाठक यांनी समन्वयक म्हणून काम पाहिले. सूत्रसंचालन अमित शिंदे आणि सानिया शेख यांनी केले. या उपक्रमांमध्ये पदवी आणि पदव्युत्तर स्तरावरील ५० हून अधिक विद्यार्थी व शिक्षकांनी सहभाग घेतला.
या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डॉ. प्रकाश महानवर, प्र कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा आणि प्र-कुलसचिव डॉ. अतुल लकडे यांचे मार्गदर्शन लाभले. संकुलातील सर्व विद्यार्थी, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या संयुक्त प्रयत्नांतून हा उपक्रम यशस्वीरीत्या पार पडला.




Comments
Post a Comment