कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचणार.
कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचणार.
गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट :-
भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यात सामंजस्य करार झाला. मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात, इटली–भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. यावेळी लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार, लिडकारच्या व्यवस्थापकीय संचालक संचालिका डॉ. के. एम. वसुंधरा, प्राडा समूहाच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागाचे प्रमुख लोरेंझो बर्टेली उपस्थित होते.शतकांपासून वापरात असलेल्या पारंपरिक चप्पल निर्मितीच्या पद्धती, प्राडाच्या आधुनिक व समकालीन डिझाईन शैली या माध्यमातून चप्पल विकसित केल्या जात आहेत. पारंपरिक कौशल्य आणि आधुनिक लक्झरी फॅशनच्या मदतीने पारंपारिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ मिळणार आहे. या विशेष चप्पला फेब्रुवारी २०२६ मध्ये प्राडाच्या ४० विक्री केंद्रांमध्ये तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होतील.या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाचे ठोस पाठबळ लाभले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे सक्रिय मार्गदर्शन मिळाले आहे. हा करार प्रधान सचिव तथा लिडकॉमचे अध्यक्ष डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांच्या धोरणात्मक नियोजनामुळे शक्य झाला आहे.

Comments
Post a Comment