काळगांव परिसरात भात लावणीस प्रारंभ.

 काळगांव परिसरात भात लावणीस प्रारंभ.

तळमावले/वार्ताहर

पाटण तालुक्यातील काळगांव विभागात महत्त्वाचे पीक असलेल्या भात लावणीच्या कामांना जोरदार सुरुवात झाली आहे. शेतकऱ्यांसाठी लागवणीसाठी महिलाही शेतात भात लागण करताना दिसत आहेत. त्यामुळे शेत शिवार माणसांनी गजबजून गेला आहे.


धुळवाफेवरील भात पेरणी ते भातलावणी असा काहीसा क्रम या विभागातील पेरणीमध्ये आढळून येतो. कमी पाण्यावरील व जास्त पाण्यावरील भाताची पिके घेतली जातात. ज्या ठिकाणी कमी पाणी अशा ठिकाणी धूळवाफेवारील भाताचे पीक व ज्या ठिकाणी पाणी मुबलक असते तेथे भात लावणी करण्यात येते.

डोंगरकपारीतील डाकेवाडी, लोटळेवाडी, मस्करवाडी, मळाईचीवाडी, निवी, कसणी, निगडे, वरचे घोटील, सातर, तामीणे, पाळशी, पानेरी या गावात नाचणीचे पीक घेतले जाते. त्यास या भागात ‘आवटणे’ असे म्हटले जाते. भात लावणीनंतर पेरणी करण्याचा हंगाम संपतो असे म्हटले तरी ते वावगे ठरु नये. धूळवाफेवरील पेरणी पूर्ण केल्यानंतर पावसाने उघडीप दिल्यामुळे भांगलणी, कोळपणी अशी कामे शेतकरी उरकतात. यंदा मात्र पावसाने उघडीप न दिल्याने ही कामे खोळंबली आहेत.

दरम्यान, याच कालावधीत भात लावणीसाठी तरवा टाकला जातो. भांगलणी व कोळपणीच्या दरम्यान तरव्याच्या शेजारील शेतीचा भाग नांगरला जातो. त्यास ‘वाफे चिरणे’ असे म्हणतात. हे झाले की तरवा काढून संबंधित रानात पाणी सोडून ते पुन्हा नांगरले जाते. त्यात चिखल तयार करतात. त्यानंतर औजाराने ते शेत एकजीव करुन तरव्याची रोपे रोवली जातात अशी भात लावणीची प्रकीया आहे. ही भात लावणीची कामे सध्या सुरु आहेत.

मस्करवाडी, चोरगेवाडी या परिसरात रानगव्यांनी हैदोस घातल्याने तरुंचे मोठया प्रमाणात नुकसान झाले आहे. त्यामुळे भात लावणीसाठी काय करायचे हा मोठा प्रश्न त्यांच्यासमोर आ वासून उभा आहे.


भात लावणीसाठी पैरा पध्दत :

भात लावणीच्या या पध्दतीस काळगांव विभागात ‘रोपा लावणे’ असे म्हटले जाते. परंतू या पध्दतीमुळे भाताचे उत्पन्न चांगले मिळते. एका औताच्या पाठीमागे 2 औत धरण्यासाठी, 2 बांध धरण्यासाठी व 4 ते 5 भात लागण करण्यासाठी महिला आणि पुरुष असतात. अजूनपर्यंत या कामासाठी पैरा पध्दत आहे. यामुळे लोकांच्यातील एकोप्याची भावना दृढ होत आहे. अशी प्रतिक्रिया शेतकरी राजाराम डाकवे (तात्या) यांनी व्यक्त केली आहे.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .