‘वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड’ मध्ये डी.एस.दिक्षीत यांच्या नावाची नोंद.
‘वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड’ मध्ये डी.एस.दिक्षीत यांच्या नावाची नोंद.
तळमावले/वार्ताहर
पाटण तालुक्यातील कुठरे येथील सेवानिवृत्त कलाशिक्षक म्हणजे दामोदर शामराव दिक्षीत उर्फ डी.एस.दिक्षीत यांनी लाॅकडाऊनच्या काळाचा सदुपयोग करत जाळीदार पिंपळाच्या पानावर 75 विविध कलाकृती रेखाटल्या होत्या. या चित्राची नोंद नोंद वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड या पुस्तकात झाली आहे. त्याचे सर्टीफिकेट आणि मेडल त्यांना मिळाले आहे. ‘वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड’ या पुस्तकाने दिक्षीत सर यांची दखल घेतल्याने त्यांच्या कलात्मक उपक्रमाला ‘चार चाॅंद’ लाभले आहेत. या चित्रांचे प्रदर्शन भरवण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे. या कामी त्यांना पत्नी रुक्मिणी, मुले ज्योती आणि चेतन यांचे सहकार्य लाभले.
विशेष म्हणजे नेमणूक आणि सेवानिवृत्ती ही कुठरे येथील हायस्कूलवर झाली. आपले काम, आणि त्याच्याशी प्रामाणिकपणा हे तत्व त्यांनी सेवा काळात अत्यंत कसोशीने जपले. त्यामुळेच ते सेवानिवृत्ती नंतरही आपल्या कलेच्या विश्वात रमून गेलेले पहावयास मिळतात.
आटके येथील कलाशिक्षक एस.एन.पाटील, चुलते राम सुतार आणि पांडुरंग सुतार यांच्या कलेतील कामाचा प्रभाव दिक्षीत सर यांच्यावर पडला. त्यामुळे 10 वी पर्यंत शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी कलानिकेतन काॅलेज कोल्हापूर येथे 1984 रोजी एटीडीचा कोर्स पुर्ण केला. खरंतर त्यांनी जी.डी.आर्ट करायचे होते परंतू त्यांच्या प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना माघार घ्यावी लागली. 1982 मध्ये कृष्णा हाॅस्पिटल येथे डाॅ.एच.आर.टाटा यांनी त्यांच्या हदयावर सातारा जिल्हयातील पहिली यशस्वी शस्त्रक्रिया केली. त्यामुळे दिक्षीत सर डाॅ.टाटा आणि जयवंतराव भोसले यांचे ऋण आजही व्यक्त करतात.
विध्यार्थ्यांना कलेचे शिक्षण देत असताना त्यांनी शाळेमध्ये बोलक्या भिंती प्रकल्प पहिल्यांदा राबवला. त्यानंतर काळगांव, ढेबेवाडी या शाळेतही त्यांनी आपल्या कामाचा ठसा उमटवला. तद्नंतर नवीन घर बांधण्यापूर्वी घर कलाकाराचे वाटावे यासाठी त्यांनी स्वतः आपल्या नियोजित घराची थर्मोकोलची प्रतिकृती तयार केली व तसे काम त्यांनी स्थानिक गवडयांकडून करवून घेतले. त्यानंतर त्यानी आपल्या घराला आर्ट गॅलरीच बनवले. स्वतः रेखाटलेली चित्रे आकर्षक फ्रेम मध्ये भरुन ती घरामध्ये लावली आहेत. घराला त्यांनी "कल्पतरु" कलादालन हे नाव दिले आहे. अनेक मान्यवरांनी या घराला भेटी देवून दिक्षीत सर यांचे कौतुक केले आहे. महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, माजी मंत्री स्व.विलासराव पाटील, संस्थेचे इन्स्पेक्टर ढगे सर, एम.आर.कदम, इनस्पेक्टर नायकवडी इ.नी भेटी देवून आर्ट गॅलरीचे कौतुक केले आहे.
शाळेमध्ये शिकवत असताना त्यांचा प्रत्येक कामामध्ये बारकावा असल्याचा दिसून येतो. त्यांनी तयार केलेल्या टाचण वहीचे शिक्षणाधिकारी मकरंद गोंधळी यांनी कौतुक केले होते.
सेवानिवृत्तीनंतरचा बराचसा काळ त्यांनी चित्रकलेसाठी दिला आहे. यातून त्यांना मोठ समाधान, आनंद मिळत असल्याचे ते म्हणतात. चित्रे काढायला बसल्यानंतर ते एकरुप होवून जातात, तहानभूक विसरुन ते काम करतात. कलेतील कार्याबद्दल त्यांना संस्थांनी आदर्श शिक्षक पुरस्कार, उपक्रमशील कलाध्यापक शिक्षक पुरस्कार देवून गौरवले आहे. 1988-1990 या काळात त्यांनी जिल्हा कलाध्यापक संघाचे कार्यवाहक म्हणून काम पाहिले आहे.
कलाशिक्षक बी.एस.पवार, विजय भंडारे, भरत कुंभार यांचेही त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभते. सेवाभावी, आपल्या विषयाशी प्रामाणिक राहणे म्हणजे काय? हे डी.एस.दिक्षीत सरांच्या बोलण्यातून आपल्याला समजते. दिक्षीत सर यांच्या कलात्मक उपक्रमाची दखल वर्ल्ड ग्रेटेस्ट रेकाॅर्ड या पुस्तकाने घेतल्याने विविध स्तरांतून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Comments
Post a Comment