नांदगाव येथे धनगर समाजबांधवांचा मेळावा उत्साहात संपन्न.

 

धनगर समाजाला न्याय दिल्याशिवाय  भाजपा स्वस्थ बसणार  नाही : आ. चंद्रशेखर बावनकुळे.

नांदगाव येथे धनगर समाजबांधवांचा मेळावा उत्साहात संपन्न.

कराड, ता. १२ : काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने आत्तापर्यंत धनगर समाजाचा वापर फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी व मतांसाठी केला. पण धनगर समाजाच्या हिताचा विचार करणारा कोणता पक्ष असेल, तर तो फक्त भाजपा आहे. धनगर समाजाच्या आरक्षणाचा प्रश्न न्यायालयात प्रलंबित असून, तो सोडविण्यासाठी केंद्राच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न केले जातील. धनगर समाजाला न्याय दिल्याशिवाय भाजप स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. भाजपाच्यावतीने नांदगाव (ता. कराड) येथे आयोजित धनगर समाज बांधवांच्या भव्य मेळाव्यात ते बोलत होते. 


भाजपाच्या लोकसभा प्रवास योजनेअंतर्गंत आ. बावनकुळे सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले होते. सायंकाळी नांदगाव येथे त्यांचे ढोलांच्या गजरात जोरदार स्वागत करण्यात आले. तसेच धनगर समाजाच्यावतीने पारंपरिक घोंगडे व काठी देऊन उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. 


 विचारमंचावर भाजपाचे प्रदेश सरचिटणीस मुरलीधर मोहोळ, विक्रांत पाटील, जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे, प्रदेश सचिव विक्रम पावसकर, ज्येष्ठ नेते मकरंद देशपांडे, प्रदेश कार्यकारिणी सदस्य तथा लोकसभा प्रभारी डॉ. अतुल भोसले, तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, कराडच्या माजी नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, मलकापूरचे माजी नगराध्यक्ष आबासाहेब गावडे, य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे संचालक दयानंद पाटील, बबनराव शिंदे, बाजीराव निकम, जि. प. सदस्य गणपतराव हुलवान, प्रियांका ठावरे, धैर्यशील कदम, रामकृष्ण वेताळ आदी मान्यवर प्रमुख उपस्थित होते.


आ. बावनकुळे म्हणाले, आज देश पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली प्रगतीकडे वाटचाल करत आहे. केवळ भारतच नव्हे तर जगातील १५० देशांनी त्यांना आपला नेता मानले आहे. जगभरात विश्वगुरु म्हणून त्यांना ओळखले जात असून, येत्या काळात जगाचे नेतृत्व भारताकडे राहणार आहे. यासाठी आपण सर्व समाजबांधवांनी आपल्या कुटुंबातील मुलांना उच्चशिक्षित करुन, त्यांना देशविकासात योगदान देण्यासाठी तयार करावे. देशात २२ कोटींहून अधिक धनगर समाज संघटीत झाला आहे. भाजपाने या समाजाच्या उन्नतीसाठी सदैव प्रयत्न केले असून, महाराष्ट्रातून भाजपाने खासदार डॉ. विकास महात्मे यांना राज्यसभेचे; तर आ. गोपीचंद पडळकर यांना विधान परिषदेचे सदस्यत्व देऊन संपूर्ण धनगर समाजाचा गौरव केला आहे. 


येत्या काळात कराडमध्ये धनगर समाजाचे राष्ट्रीय नेते व केंद्रीय मंत्री ना. एस. पी. बघेल यांच्या उपस्थितीत भव्य कार्यक्रम घेण्याचे नियोजन असून, येत्या काळात देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये धनगर समाजाला मोठे नेतृत्व करण्याची संधी मिळेल, अशी ग्वाही त्यांनी दिली. 


डॉ. अतुल भोसल म्हणाले, की गेल्या भाजपा सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस यांनी धनगर समाजाच्या हितासाठी अनेक योजना राबविल्या. कोरोनाच्या संकट काळात लोकांची काळजी घेण्यासाठी त्यांनी महाराष्ट्राचा दौरा केला. नरेंद्र मोदींच्या परराष्ट्र धोरणामुळे आज भारत जगात आघाडीवर आहे. लोकहितासाठी काम करणाऱ्या भाजपाला मजबूत करण्यासाठी येत्या जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीत सर्व जागांवर भाजपाचे उमेदवार निवडून आणून, भाजपाचाच जिल्हा परिषद अध्यक्ष बनविणार असल्याचा ठाम विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच लोकसभेला कराड दक्षिणमधून मोठे मताधिक्य मिळवून देण्याची ग्वाहीदेखील त्यांनी दिली. 


भाजपा महिला मोर्चाच्या जिल्हा उपाध्यक्षा डॉ. सारिका गावडे यांनी प्रास्तविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. यावेळी कृष्णा कारखान्याचे माजी संचालक पांडुरंग होनमाने, मुंढे गावचे माजी सरपंच रमेश लवटे, तानाजी माने, राजाराम डाईंगडे, दत्ताजीराव थोरात, बजरंग गावडे यांच्यासह कराड दक्षिणच्या विविध गावांमधील धनगर समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कराड दक्षिणमध्ये आता एकच बाबा, अतुलबाबा!


‘‘कराड दक्षिणमध्ये डॉ. अतुलबाबा भोसले धनगर समाजाला उभारी देण्यासाठी प्रयत्नरत आहेत. पक्ष त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभा असून, आपण सर्वांनीही त्यांना पाठबळ द्यावे. दक्षिणमध्ये आता एकच बाबा राहतील, ते म्हणजे फक्त अतुलबाबा..!’’, असे प्रतिपादन भाजपाचे प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रशेखर बावनकुळे यांनी करताच, सभागृहातील सर्व धनगर समाजाबांधवांनी अतुलबाबांच्या विजयाच्या घोषणा देत आसमंत दणाणून सोडला. 


‘मोठे’ म्हणून कुणाच्याही मागे उभे राहू नका!

भाजपाचे जिल्हाध्यक्ष आ. जयकुमार गोरे यांनी आमदार पृथ्वीराज चव्हाण यांच्यावर नाव न घेता टीका केली. ते म्हणाले, ‘ते’ मोठे आहेत, म्हणून कुणाच्याही मागे उभे राहू नका. जो तुमच्या मदतीसाठी इथे तत्पर आहे, असे फक्त अतुलबाबाच आहेत. त्यामुळे त्यांच्या मागे राहून, मी जेव्हा २०२४ ला विधानसभेत जाईन तेव्हा अतुलबाबांना आमदार म्हणून माझ्यासोबत पाठवून देण्याची जबाबदारी तुमची आहे, असे आवाहन आ. गोरे यांनी उपस्थितांना केले.


Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .