आनंददूत....

                      आनंददूत....


मुलांच्या आनंदासाठी माझी चाललेली धडपड पाहून तिने मला केलेली मदत विचार करायला लावणारी होती. हल्ली प्रत्येक गोष्टीत 'व्यवहार' शोधणाऱ्या माणसांच्या गर्दीत त्या ताईचे वागणे मला खूप काही शिकवून गेले. तिच्या स्वभावातील सहजता मला स्वच्छ काचेच्या गोट्यासारखी भासली.

       कंचे नाते...खरे !

                                        अनुभव.                                    

आपल्या आयुष्यात काही घटना अशा घडतात की, त्यातून आपल्याला जीवनमंत्र मिळतो. समाजातील अशिक्षित व साधी माणसं देखील आपल्या वागण्यातून सदाचाराची शिकवण देतात. असाच एक प्रसंग. एक इंग्रजी म्हण आहे, The best helping hand is at the end of your own arm. याचा अर्थ "तुमचा सर्वात चांगला मदतकर्ता हे तुम्ही स्वतःच आहात. तुमच्या हातांचा म्हणजेच श्रमाचा उपयोग करून तुम्ही स्वतःची मदत करू शकता. इतरांची मदत घेण्याची गरज नाही. उलटपक्षी तुम्हीच इतरांना मदत करू शकता. याची दुर्मिळ प्रचिती मला आली. त्याबद्दल थोडे प्रासंगिक लिहावे. म्हणून थोडेसे मांडण्याचा प्रयत्न... थोडे उपेक्षितासाठी हे शब्द...

बालहट्ट, राजहट्ट आणि स्त्रीहट्ट पुरवणे किती अवघड असतो. याला कोणीही चुकणार नाही. मी ही कसा अपवाद ठरेन. आराध्य माझा तीन वर्षांचा मुलगा. त्याने मला, घरी येताना कंचे घेऊन या, असे सांगितले. दुपारी गावातील दुकाने चालू नसतात. अशा स्थितीत वाटेत असलेल्या गावातील दुकानात कंच्यांचा शोध सुरू केला. गावातील सर्व १० दुकाने पालथी घातली, पण कंचे कुणाकडेच नव्हते. शेवटचा प्रयत्न म्हणून एका दुकानदाराला विचारले, "कोठे मिळू शकतील कंचे?" तो उत्तरला, "मला काय माहीत!" तरीही आणखी एकदा मी तोच प्रश्न रेटला. तो रागातच म्हणाला, "समोरच्या रस्त्याहून पाठीमागे जा. तेथे ठोके यांचे दुकान आहे. विचारा त्यांना." मी शेवटचा पर्याय म्हणून त्या दुकानात गेलो. ठोके यांचे ते मल्टिपल दुकान पाहून मला हायसे वाटले. दुकानदाराला हाका दिल्या, "ओ... ओ..." पण पुढून प्रतिसाद शून्य! मी सहज जवळ जाऊन पाहिले तर त्यांचे कानातील मशीन हेडफोनसारखे लोंबकळत होते. त्यांच्या आणखी जवळ जाऊन मशीन कानाला अडकवले. नंतर लगेच ॲक्टिव्ह होत त्यांनी प्रश्न केला, "काय पाहिजे?" मी म्हणालो, "कंचे." त्यांना हा शब्द समजलाच नाही. "आयरे...लहान मुले खेळतात त्या काची गोटीया.", मी खुलासा केला. पण त्यांचे मशीन व्यवस्थित काम करत नव्हते. मी पुन्हा मोठ्याने ओरडलो, "आयरे...आयरे...आयरे..." दरम्यान आमचे हे संभाषण दुकानाबाहेर रस्त्यावर घडशी समाजातील ताई कुतूहलाने ऐकत होती. तिच्या डोक्यावर बुट्टी होती. मी आणखी आवाज चढवला, "आहेत का आयरे?" दुकानदाराचा नकार यायच्या आतच त्या ताईने हस्तक्षेप केला, "आयरे पाहिजेत व्हय! इकडे या. म्या देते." मला वाटले, उगाच म्हणत्यात. मी त्यांच्याजवळ जाऊन म्हटले, "खरंच आहेत?" "हो आहेत. तुम्ही त्या तिथे उभे राहा. मी आलेच घेऊन." असे म्हणत त्या लगबगीने गेल्या. मी काही वेळ वाट पाहिली. त्या वाड्यातून बाहेर आल्या व माझ्या हातावर बरणी देत म्हणाल्या, "हे घ्या." मी बरणी उघडली. बघतो तर काय! पाच-दहा नव्हे तर कंच्यांनी बरणी काठोकाठ भरलेली. मला काहीच कळेना. एवढे कंचे कसे काय तुमच्याकडे, असे म्हणत मी पैसे देण्यासाठी खिशात हात घातला. "किती पैसे झाले?" असे विचारताच त्या म्हणाल्या, "मला पैसेबिसे नको." अर्ध्या प्लॅस्टिकच्या बरणीवर जमा झालेली धूळ झटकून पाण्याने स्वच्छ करून त्यांनी बरणी मला सुपूर्द केली होती.

मुलाच्या आनंदासाठी माझी चाललेली धडपड पाहून तिने मला केलेली मदत विचार करायला लावणारी होती. हल्ली प्रत्येक गोष्टीत 'व्यवहार' शोधणाऱ्या माणसांच्या गर्दीत त्या ताईचे वागणे मला खूप काही शिकवून गेले. तिच्या स्वभावातील सहजता मला स्वच्छ कंच्यासारखी भासली. "माझं पोरगं १८ वर्षाचं झालं आता. त्याचे कंचे मी जपून ठेवले होते. ते आता तुझ्या पोराला खेळायला ने." ताईने गोळा केलेल्या कंच्यांचा इतिहास उलगडत आग्रह केला. एका पिढीचा आनंदाचा वारसा दुसऱ्या पिढीकडे पोहोचविणाऱ्या आनंददूत त्यांच्यात मला भेटला. आपले प्रयत्न निर्मळ व प्रामाणिक असतील तर नात्याचे सोडा, अनोळखी, आकस्मिक भेटणारे, सहप्रवाशी देखील आनंददूत म्हणून तुमच्या पुढे उभे राहतात, याची प्रचिती मला आली. बरणी घेऊन तेथील पेठेतून निघणार तोच ताईने आरोळी दिली, "पोरगं तोंडात आयरे घालेल. ध्यान ठेव...!" गाडीच्या डिक्कीत ती बरणी ठेवताना मनात सहज विचार आला, रोज दिसले तरी तोंडे फिरवणारी, खूप अपेक्षा बाळगणारी नाती खरी, की त्या ताईचे नक्की कंचे (कोणते) नाते खरे...! नाते कंचेही असूद्या; पण निस्वार्थी नात्याला कशाचीच उपमा देता येत नाही. हीच अनुभूती मला या प्रसंगातून आली. दीर्घकाळ सहवास लाभूनही काही नाती परकी वाटतात, तर काही नाती अल्पकाळातही मनात कायमची जागा करतात. हे नाते त्यापैकीच एक. पैशांनी सर्व नाती तयार होत नाहीत, त्यासाठी हवे असते शुद्ध मन!

                           प्रा. संभाजी पाटील.

      शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .