पुन्हा बुद्ध शासन हवे आहे!

 पुन्हा बुद्ध शासन हवे आहे!



                         

   ब्यूरो रीपोर्ट - भिमराव परघरमोल.

      

              विश्वामाजी असणाऱ्या धर्मांपैकी प्रत्येकाच्या तत्त्वज्ञानामध्ये विविधता आढळते. काहींचे तत्त्वज्ञान समतावादी आहे तर काहींचे विषमतावादी. विषमतावादी तत्वज्ञान असणाऱ्या धर्माचा केंद्रबिंदू हा ' मानव ' असण्याचा दुरान्वयानेही संबंध नाही. परंतु काही समतावादी धर्म सुद्धा साक्षात्कारी असल्याचे अभ्यासाअंती निदर्शनास येते. त्यापैकी बुद्धाचा धम्म हा स्पष्ट आणि निसंशय मानव केन्द्रित असल्याचे सिद्ध झाले आहे.

            सिद्धार्थ गौतमाच्या गृहत्यागाची विविध कारणे असली तरी मूळ कारण मात्र मानवी दुःखाचंच मूळ शोधने हेच होतं. या जगामध्ये दुःख का आहे? याचा शोध घेण्यासाठी त्यांनी तत्कालीन परिस्थितीमध्ये उपलब्ध सर्व मार्ग धुंडाळले. त्यामध्ये त्यांना जगातील अनेक प्रश्नांची उकल होत होती. परंतु दुःखाची कारणमीमांसा सापडत नव्हती. सर्व मार्गांच्या अभ्यासांती स्वतः केलेल्या चिंतन, मनन आणि तपश्चर्येने त्यांना दुखाच्या मुळापर्यंत पोहोचता आलं. दुःखाचं कारण फक्त आणि फक्त तृष्णाच असल्याचं त्यांच्या लक्षात आलं. त्यावर मात करून मानवाला जर दुःखमुक्त जीवन जगायचे असेल तर पंचशिल, अष्टांगिक मार्ग आणि दहा पारमिता यांचा अभ्यास करून त्याप्रमाणे आचरण करणे गरजेचे आहे. त्याशिवाय पर्यायच नाही असं त्यांचं अंतिम मत तयार झालं. परंतु एक मात्र महत्त्वाचं त्यासाठी त्यांनी कोणत्याही मध्यस्थाची गरज ठेवली नाही.

           काही धर्मांच्या संस्थापकांनी काही अटी आणि शर्ती ठेवून असा दावा केलेला आहे की, जर मानवाला देवांच्या राज्यात प्रवेश  मिळवायचा असेल, जन्म-मरणाच्या फेऱ्यातून सुटका करून मुक्ती मिळवायची असेल, स्वर्गाची अपेक्षा असेल किंवा जन्नत हवी असेल तर मात्र आमच्या मध्यस्ती शिवाय पर्याय नाही. काहींच्या दाव्यानुसार तर, आम्हीच देवाधिदेव आहोत आमच्या पर्यंतचा प्रवास हा आमच्या भक्तिभावानेच शक्य आहे. परंतु तथागत बुद्ध अशी कोणतीही अट किंवा दावा न करता, मी फक्त मार्गदाता आहे मोक्षदाता नाही, असे  निसंशय सांगतात. म्हणूनच त्यांनी त्यांच्याच धम्मामध्ये स्वतःसाठी कोणतेही स्थान राखून ठेवले नाही.

              तथागत भगवान बुद्धाच्या पूर्वी आणि समकालीन काही विचारधारा प्रचलित होत्या. त्या मानवी  उत्थानासाठी उपयुक्त आहेत किंवा नाही याची पडताळणी त्यांनी केल्याचे दिसून येते. पूर्वकलिनांमध्ये वैदिक तत्त्वज्ञान व त्या आधारित भूमिका मांडणारे आठ ऋषी, तत्त्ववेत्ता कपिलमुनी, ब्राह्मणे आणि उपनिषदे या धर्मग्रंथांचा समावेश होता. वैदिक ऋषींनी काही प्रश्नांची उकल करण्याचा प्रयत्न केला, जे भगवान बुद्धाला निर्थक वाटले. त्यामध्ये जगाची उत्पत्ती कशी झाली? वस्तूची निर्मिती कशी झाली? कुणाच्या आज्ञेने झाली? त्यांचे ऐक्य व अस्तित्व कायम आहे का? जग कशापासून निर्माण झाले? मी कोण आहे? कोठे जाणार आहे? इत्यादी प्रश्नांपर्यंत पोहोचण्याचा  त्यांनी प्रयत्न केला. परंतु चाचपडण्या पलीकडे त्यांच्या हाती काहीही लागले नाही. म्हणून भगवान बुद्धाने ते सर्व नाकारले. तत्त्ववेत्ता कपिल यांनी मांडलेला सांख्य तत्वज्ञानाचा सिद्धांत त्यांनी स्वीकारला, कारण सत्याला पुराव्याची गरज असल्याची मांडणी जगात प्रथम कपिल मुनिनेच केली. वेद हे ओसाड वाळवंटासारखे आहेत, असे भगवान बुद्ध म्हणतात. तर ब्राह्मणे आणि उपनिषदातील तत्त्वज्ञान सुद्धा वेद तथा आत्मा आणि परमात्मा यावर आधारित असल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यामुळे त्यामध्ये त्यांना  मानवहीत कोठेही जाणवले  नाही.

              भगवान बुद्धाच्या समकालीन वैदिक तत्वज्ञानाच्या विरोधी ६२ विचारधारा प्रचलित होत्या. त्यापैकी सहाच दखल पात्र असून त्याही मानवाच्या दुःखा विषयी भाष्य करण्यास असमर्थ होत्या. त्यामुळे त्याही अस्वीकारार्ह असल्याचे त्यांच्या लक्षात आले. कारण पूर्ण कश्यप आणि पकुध कच्छायन यांचे तत्वज्ञान वाईट गोष्टीस प्रोत्साहन देऊन, हत्या करण्याची परवानगी देणारे होते. तर दैवाच्या गुलामीत कायम ठेवणारे तत्त्वज्ञान मक्खली गोसाल यांनी मांडलेले होते. संजय बेलपुत्त यांच्याकडे जीवनाचे निश्चित असे तत्त्वज्ञान नसून मानवाला भटक्यांचे जीवन जगण्यास भाग पाडणारे होते. तर निगंठनाथाच्या विचारानुसार मानवी जीवनातील सहजप्रवृत्ती व कामना यांचा बीमोड करून संन्यास व तपश्चर्या यांचेच दास्यत्व पत्करावे लागेल. म्हणून तथागत बुद्धाने तेही हताश असहाय आणि अविचारी माणसांचे विचार म्हणून त्याज्य ठरविले.

                प्रचलित तत्त्ववेत्ते, ऋषी, उपलब्ध धर्मग्रंथ आणि त्यांचे तत्वज्ञान यांचा बारकाईने अभ्यास केल्यानंतर भगवान बुद्धाने काही गोष्टी त्याज्य ठरविल्या. काही मध्ये बदल केले, तर काहींचा स्वीकार करून मानवी हिताचे जगातील एकमेवाद्वितीय, प्रगल्भ, विज्ञानवादी, तर्कनिष्ठ आणि बुद्धिप्रामाण्यवादी तत्वज्ञानाची अडीच हजार वर्षांपूर्वी मांडणी केली. जे आजही मानवी हीत आणि उत्थान साधून समाजधारणेस जसेच्या तसे उपयुक्त  आहे.

                भगवान बुद्धाने त्याज्य ठरवलेल्या गोष्टींमध्ये वेदप्रामाण्य, आत्म्यावरील विश्वास त्याचे अस्तित्व, मुक्ती व पुनर्जन्म, मोक्षप्राप्ती ची साधने, धार्मिक विधी व यज्ञ, चातुर्वर्ण्य व्यवस्था, विश्वाचा निर्माता ईश्वर आणि  ब्रम्हा, पूर्वजन्मीच्या पापांमुळे या जन्माचे स्थान निश्चित होणे, मी कोण आहे? कुठून आलो? कुठे जाणार आहे? याची  कल्पना आवृत्ती, काही शून्य वादी पाखंडी मते, विश्वाचा प्रारंभकाळात सांगता येतो इत्यादी सर्व त्यांनी सप्रमाण  नाकारले. तर कार्यकारणभावाचा अत्यंत महत्त्वाचा सिद्धांत त्यांनी मान्य केला. कर्माचा दैववादी दृष्टिकोन नाकारून शास्त्रीय दृष्टिकोन मांडला. तर आत्म्याच्या मुक्तीऐवजी निब्बान (निर्वाण) तत्व स्वीकारले.

                  भगवान बुद्धांनी तत्वज्ञानाच्या केंद्रस्थानी माणसाला ठेवून त्याच्या  विकासासाठी, सुखासाठी किंवा दुःख मुक्तीसाठी मानवी मनाला केंद्रबिंदू मानले. कारण बऱ्या-वाईट उक्ती तथा कृती आणि त्यासंबंधी आचार विचार प्रथम मनामध्येच निर्माण होतात. मन सर्व वस्तूंचे  उगमस्थान आहे. प्रत्येक वस्तूचे आकलन प्रथम मनामध्येच होते. मन हे सर्व मानसिक शक्तीचे प्रमुख असून सर्व क्रियांचे मार्गदर्शक आहे. म्हणून त्याला प्रथम संस्कारित केले पाहिजे. जेणेकरून त्यामध्ये वाईट गोष्टींची निर्मिती व तृष्णा उत्पन्न न होता मानवी जीवन दुःख मुक्त होईल.      

                 भगवान बुद्ध व त्यांच्या तत्वज्ञानाविषयी आधुनिक विचारवंत व शास्त्रज्ञ यांचे विचारही जाणून घेणे आवश्यक आहे. जेणेकरून ते कसे मानव केंद्रित आहे हे कळण्यास मदत होईल. प्रा. एस.एस. राघवाचार्य म्हणतात," भगवान बुद्धाच्या जन्मापूर्वीचा काळ हा तमोयुगापैकी एक होता. तर प्रज्ञेच्या व नेतिकतेच्या दृष्टीने ते मागासलेले युग होते. बौद्ध धर्मानेच मानवात स्थित असलेल्या अंत:सामर्थ्याच्या शोधाकडे मानवाचे लक्ष वेधले."

                 प्राध्यापक डवाईट गोडार्ड म्हणतात की," जगातील धर्मसंस्थापकांपैकी बुद्धानेच मानवतेची योग्यता उंचावून, मानवाची मुक्ती मानवातच शक्य असल्याचा स्वाभाविक मोठेपणा ओळखला. तसेच त्यांनी मानवाच्यावर कोणीही संस्थापित न करता त्याला प्रज्ञा व मैत्रीच्या उंच शिखरावर विराजमान करून उच्च स्थान प्राप्त करून दिले." अशी एक ना अनेक उदाहरणे देता येतील.

               यावरून हेच सिद्ध होते की भगवान बुद्धाने मानवी जीवन  सर्वांगाने सुखी करण्यासाठी आपल्या हयातीची ४५ वर्ष खर्ची घालून विविध समस्या तथा प्रश्नांची उकल करणाऱ्या मार्गदर्शक तत्वज्ञानाचा प्रचार आणि प्रसार केला. ज्यामुळे समता, स्वातंत्र्य, न्याय, बंधुत्व या महान मानवी मूल्याधारित समाज व्यवस्था निर्माण होऊन, लोक नीतीने व मैत्रीपूर्ण जीवन जगत होते. परंतु आज पुन्हा मानवामानवांमध्ये भेद निर्माण करणाऱ्या मनुवादी तथा विषमतावादी विचारांनी उचल खाल्ली आहे. त्यामुळे मानवी जीवन असुरक्षित होऊन अज्ञानामध्ये जळत आहे.

              बुद्धाचे मोठेपण आज जगाने मान्य केले आहे. म्हणून काही लोक विदेशवारीत बुद्धाचे गोडवे गाऊन स्वदेशी मात्र विरोधी वर्तन करतात. ' सत्याला सत्य आणि असत्य त्याला असत्य म्हणण्याची ताकद देते ते शिक्षण ' या बुद्धाच्या व्याख्येप्रमाणे शिक्षणाचे उत्पादन हवे त्या प्रमाणात दिसून येत नाही. मानवी जीवनाला जर चिरकाल करायचे असेल, तर पुन्हा बुद्ध शासनाशिवाय पर्याय नाही. अन्यथा विनाशाकडे वाटचाल निश्चितच!....

                  

                       भिमराव परघरमोल

                  व्याख्याता तथा अभ्यासक

                फुले शाहू आंबेडकरी विचारधारा

                      तेल्हारा जि. अकोला

                      मो.९६०४०५६१०४

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .