चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्यासह सहकार पॅनेलमधून दिग्गजांचे अर्ज दाखल.
चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्यासह सहकार पॅनेलमधून दिग्गजांचे अर्ज दाखल.
कराड, ता. ३१ : रेठरे बुद्रुक येथील य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलचे नेते आणि कृष्णा कारखान्याचे विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. सहकार पॅनेलमधून आज कराड आणि वाळवा तालुक्यातील अनेक दिग्गजांनी अर्ज दाखल केल्याने, निवडणूक चुरशीची होणार असल्याचे दिसून येते.
पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागून राहिलेल्या कृष्णा कारखान्याच्या निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून, २५ मे पासून उमेदवारी अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस मंगळवारी असून, आज सोमवारी विद्यमान चेअरमन डॉ. सुरेश भोसले, डॉ. अतुल भोसले यांच्यासह दिग्गजांनी सहकार पॅनेलच्यावतीने उमेदवारी अर्ज दाखल केला. निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर यांच्याकडे हा अर्ज सुपूर्द करण्यात आला.
दरम्यान, आज सहकार पॅनेलच्यावतीने अन्य गटातूनही दिग्गज उमेदवारांनी अर्ज दाखल केले. वाळवा तालुक्यातील नेर्ले-तांबवे गटातून सांगली जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष, राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते तथा कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन लिंबाजीराव पाटील यांनी अर्ज दाखल केला. तसेच वाळवा तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष व सांगली जि.प.चे सदस्य तथा विद्यमान संचालक जितेंद्र पाटील यांनी रेठरे हरणाक्ष-बोरगाव गटातून, कृष्णा कारखान्याचे माजी व्हाईस चेअरमन तथा विद्यमान संचालक दयानंद पाटील यांनी काले-कार्वे गटातून, जलसंपदा मंत्री ना. जयंत पाटील व राजारामबापू पाटील बँकेचे उपाध्यक्ष जनार्दनकाका पाटील यांचे जावई तथा सांगली जि.प. सदस्या सौ. संगिताताई पाटील यांचे पती तथा नेर्लेचे माजी सरपंच संभाजी पाटील यांनी नेर्ले-तांबवे गटातून, इस्लामपूर शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष व नगरसेवक शहाजीबापू पाटील यांचे बंधू तथा विद्यमान संचालक संजय पाटील यांनी रेठरे हरणाक्ष-बोरगाव गटातून, काँग्रेसच्या कराड तालुका पंचायत समिती सदस्या नंदा यादव यांचे पती सयाजीराव यादव यांनी वडगाव हवेली-दुशेरे गटातून, तसेच ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते व उद्योगपती दत्ता देसाई यांनी नेर्ले-तांबवे गटातून यांनी अर्ज दाखल केला. दरम्यान, यापूर्वी कारखान्याचे विद्यमान व्हाईस चेअरमन जगदीश जगताप व संचालक धोंडिराम जाधव यांनी वडगाव हवेली-दुशेरे गटातून अर्ज दाखल केला आहे. सहकार व राजकारणातील दिग्गजांनी सहकार पॅनेलला पसंती दर्शविल्याने निवडणूक चुरशीची होणार असल्याचे स्पष्ट आहे.
यावेळी पत्रकारांशी बोलताना डॉ. सुरेश भोसले म्हणाले, की गेल्यावेळी सभासदांनी जयवंतराव भोसले सहकार पॅनेलला निवडून दिले. गेल्या ६ वर्षात आम्ही शेतकरी सभासदांना केंद्रबिंदू मानून कारभार केला आहे. उच्चांकी दर, मोफत साखर, ऊसविकास योजना यासारखे उपक्रम यशस्वीपणे राबविले. यावेळीही शेतकरी सभासदांचा विकास हाच मुद्दा घेऊन आम्ही निवडणुकीला सामोरे जात असून, यंदाही सभासद आम्हाला मोठ्या मताधिक्याने निवडून देतील, याची खात्री आहे.
गेल्या ६ वर्षात जयवंतराव भोसले सहकार पॅनेलने सभासदांच्या विश्वासास पात्र राहून कार्य केले आहे. यावेळी देखील आम्ही विकासाचा अजेंडा घेऊन निवडणूक लढवित असून, यंदाही सभासदांचा कल सहकार पॅनेलच्याच बाजूने आहे. त्यामुळे सहकार पॅनेलचेच उमेदवार मोठ्या मताधिक्याने विजयी होतील, असा विश्वास डॉ. अतुल भोसले यांनी यावेळी बोलताना व्यक्त केला.

Comments
Post a Comment