महिला महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

 महिला महाविद्यालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा.

कराड : प्रतिनिधी.

  शिक्षण मंडळ, कराड संचालित महिला महाविद्यालयात आय.क्यू.ए.सी.,ग्रंथालय व मराठी विभागाच्या वतीने माजी राष्ट्रपती स्व.डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचा जन्मदिवस 'वाचन प्रेरणा दिन' म्हणून उत्साहात साजरा करण्यात आला.

याप्रसंगी प्रमुख वक्ते म्हणून टिळक हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयातील उपशिक्षक श्री.संदीप जोशी उपस्थित होते. ते म्हणाले की,भारताचे माजी राष्ट्रपती स्व. डॉ. कलाम हे विद्यार्थीप्रिय राष्ट्रपती होते. त्यांचे वाचन अफाट होते. वाचन ही एकांतात आणि एकट्याने करावयाची कृती आहे. विद्यार्थी हा शाळा बाहेरच्या वाचनावरती घडतो. वाचन विद्यार्थ्यांचा भविष्यकाळ घडवितो. वाचनाचे वेड व  व्यासंग असला पाहिजे. विद्यार्थ्यांनी निसर्गवाचन सुद्धा केले पाहिजे. उत्तम ग्रंथ हा शंभर मित्रांपेक्षा सरस असतो. चौफेर वाचनामुळे व्यक्तिमत्व विकास होतो. नवीन अनुभव येतात, संभाषण कौशल्य सुधारते, एकाग्रता व मानसिक समाधान लाभते.  विचारांची अभिव्यक्ती व स्पष्टता येते, आत्मशोध घेता येतो. वाचन ही अतृप्त तहान असली पाहिजे.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. भरत बल्लाळ होते. ते म्हणाले की, वाचन संस्कृती ही सजग असली पाहिजे. वाचन संस्काराचे अनेक फायदे आहेत. आपला मेंदू कार्यरत ठेवायचा असेल तर सतत वाचत राहिले पाहिजे.

          या कार्यक्रमाचे प्रास्ताविक श्री. विलास सुर्वे यांनी केले.पाहुण्यांची ओळख ग्रंथपाल श्रीमती वैशाली सुभेदार यांनी करून दिली.सूत्रसंचालन श्रीमती रेखा धुळप यांनी केले. आभार श्रीमती कांचन थोरात यांनी मानले व आपल्या स्वरचित काव्यसंग्रहाच्या प्रती महाविद्यालयाच्या ग्रंथालयास भेट दिल्या. या कार्यक्रमास सर्व शिक्षक,शिक्षिका व विद्यार्थिनी मोठया संख्येने उपस्थित होते.




Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .