सलतेवाडीच्या माऊली दिंडीला वारकऱ्यांचा वाढता प्रतिसाद.
सलतेवाडीच्या माऊली दिंडीला वारकऱ्यांचा वाढता प्रतिसाद.
तळमावले/डाॅ.संदीप डाकवे
अवघ्या 5 वारकरी यांच्यासह सुरु झालेल्या दिंडीमध्ये आज 100 हून अधिक वारकरी आणि भक्त सहभागी होत आहेत. हीच वारीची यशस्वीता आहे. श्री समर्थ सदगुरू योगीराज हरिहर महाराज यांच्या प्रेरणेतून माऊली दिंडी सलतेवाडी ता.पाटण येथून निघते. या गावात श्री संत ज्ञानेश्वर माऊलींचे मंदीर आहे, त्यामुळे या दिंडी ला "माऊली दिंडी" संबोधले जाते.
दिंडीची सुरूवात सन 1988 साली श्री सदगुरू हरिहर महाराज यांच्या प्रेरणेने व आशीर्वादाने झाली. गावात माऊलीचे मंदिर आहे म्हणून महाराजांनी जशी आळंदीहून माऊलींची दिंडी निघते त्याच दिवशी आपल्या गावातूनही दिंडी निघावी ही महाराजांनी गावकऱ्यांना प्रेरणा दिली व प्रसाद दिला.
दिंडी चालक म्हणून महाराजांचे शिष्य ह.भ.प.ज्ञानेश्वर माऊली सपकाळवाडी याची नियुक्ती करण्यात आली. सुरूवातीला पहिल्या वर्षी पाच वारकरी निघाले त्या पाचाचे आता शंभराच्या वरती वारकरी झाले आहेत. आज या दिंडीला 35 वर्षे पुर्ण झालीत. दिंडीमध्ये ह.भ.प.बाबूराव महाराज सलते व ह.भ.प.नारायण महाराज सलते यांच्या नियोजनातून कार्यक्रम राबवले जातात. ह.भ.प.रामचंद्र शिबे (गणेश) महाराज, ह.भ.प.खाशाबा चव्हाण हे या दिंडीचे विणेकरी आहेत. झेंडेकरी म्हणून लक्ष्मण सलते, संतोष काटवटे, आनंदा चव्हाण, काशीनाथ सलते, लक्ष्मण मस्कर, चंद्रकांत अवसरे, दिंडे हे सेवा करतात. चोपदार म्हणून ह.भ.प.पांडूरंग सलते, ह.भ.प.दिलीप नाईक नवरे, सुरज निगडकर हे सेवा करतात. दिंडीमध्ये मालिका भजन, दुपारी प्रवचन, संध्याकाळी हरिपाठ व रात्री कीर्तन अखंड चालू राहते. वारकरी सांप्रदायाच्या नियमानुसार दिंडीतील सर्व कार्यक्रम चालतात. दिवसेंदिवस या दिंडीला वाढता प्रतिसाद मिळत आहे. हे या दिंडीचे वैशिष्ट्य आहे. मंगळवार दि.21 जून रोजी या पालखीचे सलतेवाडी येथून प्रस्थान झाले आहे. विविध ठिकाणी ग्रामस्थांना पालखीच्या दर्शनाचा लाभ देत ही दिंडी पंढरपूरच्या मार्गावर निघाली आहे. तळमावले येथे शिवसमर्थ संस्थेच्या आवारात पालखीच्या दर्शनाचा लाभ उपस्थितांनी घेतला. पंढरपूरला निघालेल्या भाविकांना शिवसमर्थ समुहाचे शिल्पकार अॅड.जनार्दन बोत्रे यांच्या मार्गदर्शनाखाली संस्थेच्यावतीने चहा, नाष्टा, फराळाचे वाटप करण्यात आले.
यंदा पावसामुळे या भागातील पेरण्या झाल्या नाहीत त्यामुळे अनेक वारकरी इच्छा असूनदेखील या दिंडीत सहभागी झाले नाहीत. पेरणी करुन दिंडीला जाण्याचा मनोदय त्यांनी व्यक्त केला आहे.

Comments
Post a Comment