विद्यार्थ्यांनी कौशल्य शिक्षणा बरोबरच माणूस केंद्रित जीवन व्यवहार शिकणे गरजेचे.
विद्यार्थ्यांनी कौशल्य शिक्षणा बरोबरच माणूस केंद्रित जीवन व्यवहार शिकणे गरजेचे.
- डॉ. संदीप किर्दत.
सातारा - प्रतिनिधी.
आज समाजामध्ये स्वकेंद्रित व अर्थकेंद्रित व्यवहार करणाऱ्या लोकांची संख्या अधिक दिसते. केवळ स्त्री-पुरुषाच्या पोटी जन्म झाला म्हणून व्यक्ती माणूस ठरतोच असे नाही तर ज्या स्त्री पुरुषांचा व्यवहार हा नैतिक मूल्यांना धरुन, निकोप समाज निर्माण साठी पूरक व मानव कल्याण केंद्रित असेल त्यालाच खऱ्या अर्थाने माणूस म्हणता येईल. आज तुलनेने समाजामध्ये माणूस व माणुसकीची वाणवा आढळते. त्यामुळे समाजात शोषक व शोषितांचे प्रश्न, धार्मिक सांप्रदायिक तेढ, वाढती गुन्हेगारी, नक्षलवाद, दहशतवाद, भौतिक साधनांचा अति मोह, वृद्धाश्रमांची वाढती संख्या, भ्रष्टाचार, अंधश्रद्धा ,सावकारी , शेतकऱ्यांच्या आत्महत्या, महिला व अल्पसंख्यांकांची असुरक्षितता, भाकरी केंद्रित जीवन लक्ष्य ऐवजी धर्म केंद्रित ध्येय रुजविणारे भोवतालचे वातावरण व व्यसनाधीनता असे अनेक प्रश्न निर्माण झालेले दिसतात. याकरिता सरकार, शिक्षक, कुटुंबातील सदस्य व सामाजिक संस्थांनी जाणून बुजून जैविक माणसाला माणूस बनण्यासाठी आवश्यक संस्कार व नीती मूल्ये देणारी व शिकवणारी व्यवस्था निर्माण करायला हवी. शिक्षणाचा गाभा घटक सुद्धा केवळ कौशल्य केंद्रित असून चालणार नाही तर माणुसकेंद्रित असायला हवा. असे विचार रयत शिक्षण संस्थेचे आजीव सदस्य प्रा. डॉ. संदीप किर्दत यांनी व्यक्त केले. ते छत्रपती शिवाजी कॉलेज साताराच्या राष्ट्रीय सेवा योजना विभाग (+२) व मौजे संभाजीनगर यांच्या वतीने प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित राष्ट्रीय सेवा योजना शिबिरात 'माणूस म्हणून जगताना' या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी शिवाजी विद्यालय व जुनिअर कॉलेज अपसिंगे येथील प्रा. बाळासाहेब वाघ होते. कार्यक्रम अधिकारी प्रा. गणेश लोहार यांची प्रमुख उपस्थिती होती.
डॉ. संदीप किर्दत पुढे म्हणाले की माणूस म्हणून जगण्यासाठी रुपया पेक्षा मूल्यांना महत्व देणारे बाळकडू मुलांना द्यायला हवेत. कुटुंबात संवाद असायला हवा. व्यक्तिकडे संवेदनशीलता, सहानुभूती, आत्मबलता आवश्यक आहे. व्यक्तिने तटस्थपणा सोडायला हवा.तरुण पीढीत राष्ट्रीय एकात्मतेची भावना मजबूत करायला हवी. समाजात स्त्रीचा सन्मान करण्याची व नाती जपून ठेवण्याची शिकवणुक देणारे कार्यक्रम अधिक संख्येने आखायला हवेत. दया, दान यामध्ये वीरता दाखवतानाच पर्यावरण व राजकीय साक्षरता जोपासायला हवी. विवेकवादी व विज्ञाननिष्ठ जीवन जगण्याचा प्रयत्न असायला हवा. विद्यार्थ्यांनी पाश्चात्त्य संस्कृतीचे अंधानुकरण न करता सतसंगत करीत संविधान केंद्रित व्यवहार करणे अपेक्षित आहे. माणूस म्हणून जगण्याचा मार्ग हा प्रसिद्धीचा नव्हे तर व्यक्तिमत्त्व विकास, विधायक व सदृढ समाजाच्या निर्मितीचा आहे. इतिहासातील राजे , सम्राट, समाजसुधारक व अध्यात्मिक क्रांतिकारी संत तसेच भारतीय व जागतिक सामाजिक कार्यकर्ते व नेत्यांच्या जीवनातील माणुसकीचे दर्शन घडविणाऱ्या प्रसंगाचे दाखले देत डॉ. किर्दत यांनी सांगितले की सत्याचा मार्ग कठीण अवघड असला तरी गरजेचा आहे. अलिकडे समाजात लबाडांना थोडे अधिक महत्त्व आलेले दिसत असले तरी लबाडांची लबाडी ही एक दिवस समोर येतच असते . त्यामुळे निराश न होता सत्याचा ,कष्टाचा व सकारात्मकतेने तत्त्वांच्या मार्गाने कार्यरत राहिल्यास स्वतःच्या व समाजाच्या हिताचे ठरणार आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. गणेश लोहार यांनी केले तर आभार संजय पवार यांनी मानले यावेळी राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी-विद्यार्थिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment