भूशास्त्र संकुलात PM–USHA अंतर्गत ‘अर्थ सायन्सेस ब्रिज कोर्स’चा शुभारंभ.
भूशास्त्र संकुलात PM–USHA अंतर्गत ‘अर्थ सायन्सेस ब्रिज कोर्स’चा शुभारंभ.
सोलापूर- प्रतिनिधी.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या भूशास्त्र संकुलात PM–USHA (MERU) अंतर्गत आयोजित “Fundamentals of Earth Sciences Concepts and Practices: A Bridge to Sustainability” या चार दिवसीय ब्रिज कोर्सचा शुभारंभ उत्साहपूर्ण वातावरणात झाला.
कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक डॉ. मंगेश वेदपाठक यांनी केले. कोर्सचे उद्घाटन प्र-कुलगुरू प्रा. डॉ. लक्ष्मीकांत दामा यांच्या हस्ते झाले. आपल्या उद्घाटनपर भाषणात त्यांनी विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तावृद्धीसाठी आणि कौशल्यविकासासाठी अशा ब्रिज कोर्सचे महत्त्व अधोरेखित केले.शाश्वत विकासाच्या दिशेने भूशास्त्र संकुलाने घेतलेली वाटचाल आणि विद्यापीठाच्या प्रगतीतून होणारे योगदान याबाबत त्यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या प्रथम सत्रात प्रमुख पाहुणे प्रा. चंद्रकांत काळे यांनी भू-माहिती प्रणाली (GIS) चा पर्यावरण, शेती, नैसर्गिक संसाधन व्यवस्थापन आणि आपत्ती व्यवस्थापनातील उपयोग यावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. त्यांच्या सत्राचा परिचय डॉ. अनिल येडगे यांनी करून दिला.
संकुल संचालक डॉ. विनायक धुळप यांनी संकुलामध्ये गेल्या वर्षभरात राबविण्यात आलेल्या शैक्षणिक व संशोधनात्मक उपक्रमांची माहिती दिली. तसेच आगामी वर्षातील शैक्षणिक नियोजन, प्रयोगशाळा व क्षेत्राधारित अभ्यासाच्या बळकटीकरणासंदर्भातही त्यांनी महत्त्वपूर्ण माहिती दिली.
ब्रिज कोर्सचे समन्वयक म्हणून प्रा. मृण्मयी गवळी, प्रा. अतिश धेंडे आणि प्रा. अक्षय चव्हाण यांनी कार्यभार सांभाळला. संकुलातील सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वीपणे पार पडला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. मृण्मयी गवळी यांनी केले.
--------------------



Comments
Post a Comment