एकाच कुटुंबातील चार जणांचा राहत्या घरात मृत्यू.


एकाच कुटुंबातील चार जणांचा राहत्या घरात मृत्यू.

गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट -

पाटण तालुक्यातील सणबूर येथे गुरुवारी रात्री एकाच कुटुंबातील चारजणांचा राहत्या घरात मृत्यू झाल्याचे उघडकीस आल्याने तालुका हादरला आहे. या एकाच कुटुंबातील व्यक्तींच्या मृत्यूमुळे ही आत्महत्या आहे की अन्य कारण, याबाबत तर्क-वितर्क लढविले जात असून, तपासाअंती त्यांच्या मृत्यूचे कारण स्पष्ट होईल.

आनंदा पांडुरंग जाधव (वय 75), पत्नी सुनंदा आनंदा जाधव (वय 65), मुलगा संतोष आनंदा जाधव (वय 45) व विवाहित मुलगी पुष्पलता प्रकाश धस (रा. मंद्रुळकोळे, ता. पाटण) अशी मृतांची नावे आहेत.

घटनास्थळाकरून मिळालेल्या माहितीनुसार, सणबूर येथील सेवानिवृत्त शिक्षक आनंदा जाधव हे गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. गुरुवारी त्यांना कराडच्या कृष्णा रुग्णालयात उपचारार्थ हलविण्यात आले होते. मात्र, सायंकाळी त्यांना तेथून घरी सोडण्यात आले. त्यामुळे त्यांना सणबूर येथे घरी आणले होते. त्या ठिकाणी त्यांना ऑक्सिजनची सुविधा पुरविली होती; पण त्यासाठी वीज नसल्यामुळे जनरेटरची व्यवस्था केली होती.

रात्री घरी आजारी असलेल्या आनंदा जाधव यांच्यासोबत पत्नी सुनंदा, मुलगा संतोष व विवाहित मुलगी पुष्पलता असे एकूण चौघे होते. पुष्पलता धस यांच्या मुलाने रात्री फोनवरून संपर्क साधून आजोबांच्या तब्येतीची विचारपूस केली होती. शुक्रवारी सकाळी त्याने पुन्हा फोनकरून संपर्क साधण्याचा प्रयत्न केला; पण कोणीही फोन उचलत नसल्यामुळे त्याने शेजारच्या व्यक्तींशी संपर्क साधून विचारपूस करण्यास सांगितले.

त्यानंतर काही लोक जाधव यांच्या घराकडे गेले, तेव्हा जाधव यांच्या घराचा दरवाजा आतून बंद असल्याचे निदर्शनास आले. त्यावेळी शेजाऱयांनी घराचा दरवाजा ठोठवला असता, आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. शेवटी त्यांनी दरवाजाची कडी तोडून आत पाहिले असता, घरातील चौघेही अंथरुणावर मृतावस्थेत आढळले. चौघांच्या गूढ मृत्यूचे वृत्त ढेबेवाडी खोऱयात पसरताच एकच खळबळ उडाली.

स्थानिक पोलीस पाटील यांनी तत्काळ पोलीस ठाण्याला माहिती देताच उपविभागीय पोलीस अधिकारी विवेक लावंड, सहायक पोलीस निरीक्षक अभिजित चौधरी यांच्यासह पथकाने धाव घेतली. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत शवविच्छेदनासाठी पाठवून दिले. शवविच्छेदन अहवाल आल्यानंतर मृत्यूचे कारण स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

आनंदा जाधव हे निवृत्त माध्यमिक शिक्षक होते. निवृत्त झाल्यानंतर आपल्या कुटुंबासह कराडला राहत होते. सणबूर येथे आल्यानंतर काही दिवस राहता यावे, याकरिता गावाच्या बाहेर शेतात छोटेसे पत्र्याचे घर बांधले होते. त्यांची मुलगी पुष्पलता या मंद्रुळकोळे येथील जिल्हा मध्यवर्ती बँकेचे अधिकारी प्रकाश धस यांच्या पत्नी होत्या. वडिलांची काळजी घेण्यासाठी चार दिवसांपासून त्या सणबूर येथेच मुक्कामी होत्या.

आनंदा जाधव यांना ऑक्सिजन लावण्यात आला होता. त्यावेळी लाइट नसल्याने त्यांना जनरेटर लावण्यात आला होता. त्यामुळे त्या सर्वांचा मृत्यू हा कशाने झाला, हे शवविच्छेदन अहवालानंतरच स्पष्ट होणार आहे.







वीर शिवा काशीद यांची पुण्यतिथी आरळा ता- शिराळा येथे संपन्न.








Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .