कालवडे ग्रामपंचायतीचा आडमुठेपणा उघड
कालवडे ग्रामपंचायतीचा आडमुठेपणा उघड
बेघर वस्तीतील सांडपाणी तुंबले; ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात, तीव्र नाराजी
कराड - प्रतिनिधी.
कालवडे (ता. कराड) येथील बेघर वस्ती भागात रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम पूर्ण झाले असले, तरी त्यात सांडपाण्याचा योग्य निचरा न झाल्याने संपूर्ण वस्तीत दुर्गंधी पसरली असून, ग्रामस्थ गंभीर आरोग्य समस्यांना सामोरे जात आहेत. ग्रामपंचायतीकडे सातत्याने निवेदने देऊनही प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र नाराजी आहे.
ग्रामपंचायतीमार्फत या वस्तीमध्ये रस्ता कॉंक्रिटीकरणाचे काम करण्यात आले आहे. मात्र सांडपाणी वाहून नेण्यासाठी योग्य उतार वा निचऱ्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही. परिणामी सांडपाणी तुंबून रहात असून, परिसरात दुर्गंधी पसरली आहे. पावसाळ्यात गटारातील पाणी थेट लगतच्या घरांमध्ये शिरत असून, त्यामध्ये अळ्या, किडे निर्माण झाले आहेत. त्यामुळे डेंग्यू, मलेरिया यांसारख्या आजारांचा धोका वाढत चालला आहे.
या समस्येने किसन गुजर, रमेश काकडे, राजेंद्र घोडके, महादेव मोटे, सतीश पवार, संदीप थिटे, वसीम देसाई आदि कुटुंबीय त्रस्त झाले असून, त्यांनी याबाबत गेल्या अनेक वर्षांपासून वेळोवेळी सरपंच, ग्रामसेवक यांच्याकडे तक्रारी केल्या. ग्रामसभेतही हा प्रश्न उपस्थित केला होता. मात्र, त्याकडे दुर्लक्ष झाले आहे. अखेर ग्रामस्थांनी आमदार डॉ. अतुल भोसले, जिल्हाधिकारी सातारा, गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी यांनाही निवेदने दिली, तरीही परिस्थितीत काहीच बदल झालेला नाही.
ग्रामस्थांनी आता या भोंगळ कारभाराविरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. "गटार बांधून आमच्या आरोग्यावरच घाला घातला गेला आहे. शासनाने लक्ष घालून तातडीने योग्य निचऱ्याची व्यवस्था करावी. अन्यथा, आम्ही आंदोलन करण्याच्या तयारीत असल्याचा इशारा संतप्त नागरिकांनी दिला आहे.
मूलभूत हक्काचं उल्लंघन.
याप्रश्नी ग्रामस्थांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, बेघर वसाहतीतील गटार नाले व्यवस्था पूर्णतः कोलमडली असून सांडपाणी साचल्यामुळे परिसरात दुर्गंधी आणि डासांचा प्रचंड उपद्रव वाढला आहे. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून लहान मुले, वृद्ध आणि दिव्यांग यांना विशेष त्रास होत आहे. या समस्येबाबत ग्रामपंचायतीकडे तक्रारी करूनही दखल घेतली गेली नाही, असा आरोप नागरिकांनी केला आहे. राज्यघटनेच्या कलम २१ अंतर्गत मिळणाऱ्या आरोग्याच्या मूलभूत हक्काचं उल्लंघन होत असून, तातडीने उपाययोजना न झाल्यास ग्रामपंचायत कार्यालयासमोर आंदोलन करण्यात येईल.


Comments
Post a Comment