पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियुक्ती.
पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियुक्ती.
गोंडवाना न्यूज ब्युरो रिपोर्ट -
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. सुरेश गोसावी यांची नियुक्ती झाली. तब्बल वर्षभरानंतर विद्यापीठाला पूर्णवेळ कुलगुरू मिळाल्यामुळे आता कामकाजाला गती मिळणार.
डॉ. नितीन करमळकर यांचा कुलगुुरूपदाचा कार्यकाळ मे 2022 मध्ये संपला. त्यानंतर अतिरिक्त कार्यभार डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. कारभारी काळे यांच्याकडे सोपविण्यात आला. कुलगुरू निवड शोध समिती सप्टेंबरमध्ये स्थापन झाली होती. या समितीने उमेदवारांकडून अर्ज मागवले होते. यात एकूण 90 उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. सर्व निवड प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर, अखेर डॉ. सुरेश गोसावी यांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
डॉ. गोसावी हे विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभागातील वरिष्ठ प्राध्यापक, स्कूल ऑफ फिजिकल सायन्स विभागाचे संचालक
म्हणून कार्यरत होते. त्यांच्याकडे पर्यावरणशास्त्र विभाग प्रमुख पदाचा अतिरिक्त कार्यभारही होता. त्यांनी एमएस्सी, पीएच.डी. पदवी मिळविली असून त्यांनी विविध विषयांमध्ये संशोधन पेपर्सही सादर केले आहेत. त्यांनी भौतिक शास्त्र विभागाचे प्रमुख म्हणूनही काही वर्ष काम केलेले आहे. गोसावी यांनी दि.26 ते 28 एप्रिल 2022 या काळात प्रभारी कुलगुरुपदाची धुराही सांभाळली आहे. संचालक, विभाग प्रमुख, वरिष्ठ प्राध्यापक, सहयोगी प्राध्यापक, प्राध्यापक या विविध पदावर कामांचा गोसावी यांना 31 वर्षांचा अनुभव आहे.

Comments
Post a Comment