हिंदी साहित्य व सिनेमाने भारतीय जीवन मूल्यांकडे जगाचे लक्ष वेधले. - प्रा. अविनाश पाटील.

 हिंदी साहित्य व सिनेमाने भारतीय जीवन मूल्यांकडे जगाचे लक्ष वेधले.                                               
                     - प्रा. अविनाश पाटील.

सातारा - प्रतिनिधी.

         हिंदीतील समृद्ध साहित्याचा लाभ हिंदी बॉलिवूडला व जगातील सिने सृष्टीला झालेला आहे. हिंदी साहित्याचा अनुवाद जगातील अनेक भाषेत होत आहे. जागतिक स्तरावर हिंदी साहित्य , मासिके, ब्लॉग याचबरोबर सिनेमा , मालिका, वेबस्टोरी, यु ट्यूब स्टोरी व्हिडिओ, ऑडिओ व अनुवाद यांमुळे हिंदी भाषेबद्दलचे आकर्षण वाढलेले आहे. वैश्विक पातळीवरती भारतीय  कला, संस्कृती, जीवन - मूल्ये , समाज  जीवन, साहित्य, सिनेमा  व विविध सोशल माध्यमातून पोहोचविण्यासाठी एक प्रभावी भाषा म्हणून हिंदी भाषा मोठे योगदान देत आहे. असे विचार न्यू कॉलेज कोल्हापूरचे हिंदी विभागाचे प्रमुख प्रा. अविनाश पाटील यांनी व्यक्त केले. ते येथील रयत शिक्षण संस्थेचे छत्रपती शिवाजी कॉलेजच्या हिंदी विभागाने व महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, पुणे विभागीय कार्यालय, कोल्हापूर यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विश्व हिंदी दिवस समारंभात प्रमुख  विषयतज्ज्ञ म्हणून 'वैश्विक स्तर पर हिंदी और भारतीय मूल्य विचार ' या विषयावर बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे होते ; तर ज्येष्ठ पत्रकार  दिलीपकुमार चिंचकर, उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार वावरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

    डॉ. अविनाश पाटील पुढे म्हणाले की भारतीय व प्रवासी भारतीय हिंदी साहित्यकारांनी आपल्या साहित्यातून भारतीय कुटुंब व्यवस्था व समाज जीवनातील समर्पण, विश्वास, धर्मनिरपेक्षता, स्त्री-पुरुष समानता, समता, स्वतंत्रता व बंधुता इ. मूल्ये जागतिक पातळीवर आपल्या लेखणीतून पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे. भारत देशाचे वैशिष्ट्य विविधतेत एकता आहे. जगातील विविध देशांतील लोक भारतातील भूभाग, वेशभूषा, केशभूषा, आहार, निवास व्यवस्था, भाषा, प्रांत, जात-धर्म, सण-उत्सव यांतील विविधतेमुळे भारताकडे आकर्षित आहेत. अनेक अभ्यासक भारतासारख्या लोकशाहीवादी व विकसनशील देशाचा अभ्यास करण्यासाठी उत्सुक आहेत. अभ्यासकांच्या दृष्टीने हिंदी ज्ञान भाषा म्हणून पुढे येत आहेत.

    प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे यांनी आपले अध्यक्षीय विचार व्यक्त करताना सांगितले की जगातील विविध देशातील भारतीय  कार्यालयात विश्व हिंदी दिवस साजरा केला जातो. त्यानिमित्ताने जागतिक व्यासपीठावरती राष्ट्रभाषा हिंदीचे महत्त्व पोहोचविण्याचा प्रयत्न केला जातो. जगातील महत्त्वपूर्ण विद्यापीठात  हिंदी विषयाचा अभ्यास केला जात आहे. भारतीय समाज, भारतातील राजकारण,  अर्थकारण, संस्कृती व शैक्षणिक स्थिती इ. गोष्टी समजून घ्यायच्या असतील तर हिंदीचा अभ्यास आवश्यक आहे.

    कार्यक्रमाचे प्रास्ताविक व स्वागत हिंदी विभागप्रमुख प्रो. डॉ. सविता मेनकुदळे यांनी केले. प्रमुख अतिथिचा परिचय कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. संदीप किर्दत यांनी करुन दिला. सूत्रसंचालन प्रा. सोमनाथ कोळी व कु.अमृता कुंभार यांनी केले. आभार डॉ. प्रदीप शिंदे यांनी मानले. यावेळी हिंदी प्रेमी विद्यार्थी व शिक्षक बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .