अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकू : दयानंद शिवजातक.
अन्यथा ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकू : दयानंद शिवजातक.
शिराळा - प्रतिनिधी. कांदे,ता. शिराळा या ठिकाणी दलित वस्तीमध्ये पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास ग्रामपंचायतीस टाळे ठोकू असा इशारा भारतीय दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष दयानंद शिवजातक यांनी ग्रामसेवकाकडे निवेदनाद्वारे दिला आहे. निवेदनात म्हटले आहे की गेली दोन वर्षे कांदे ग्रामपंचायत कडून दलित वस्तीमध्ये पाणी पुरवठा सुरळीत होत नसून अपुरा होत आहे. कांदे ग्रामपंचायतीच्या या मनमानी कारभारामुळे पिण्याच्या पाण्यासाठी हाल सोसावे लागत असून तीव्र संघर्ष करावा लागत आहे. कांदे ग्रामपंचायतीस वारंवार तोंडी सूचना करून देखील सरपंच,उपसरपंच व सर्व सदस्य याकडे जाणून बुजून दुर्लक्ष करत आहेत.
शासनाच्या " दलित वस्ती सुधार योजनेअंतर्गत " दलित वस्ती मध्ये आरोग्य, पाणी, वीज,रस्ते,स्वच्छता या सोयी पुरवणे बंधनकारक आहे. परंतु शासनाच्या या " दलित वस्ती सुधार योजनेची " कांदे ग्रामपंचायत कडून थट्टा होत आहे. तरी दलित वस्ती मधील पाणीपुरवठा ताबडतोब सुरळीत करावा.
सदरच्या निवेदनाची संवेदनशीलरित्या गांभीर्याने दखल घेऊन दलित वस्तीमध्ये पाणीपुरवठा सुरळीत करावा अन्यथा दलित वस्ती मधील या मनमानी कारभारास कांदे ग्रामपंचायत मधील ग्रामसेवक, सरपंच व सर्व सदस्य यांना जबाबदार धरून कांदे ग्रामपंचायती समोर तीव्र आंदोलन छेडून ग्रामपंचायत कार्यालयास टाळे ठोकले जाईल तसेच कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाल्यास त्यास शासन व प्रशासन जबाबदार राहील याची गांभीर्याने नोंद घ्यावी असा इशारा देण्यात आला आहे.यावेळी प्रफुल्ल कांबळे, वैभव शिवजातक,मंगेश कांबळे, कुणाल कांबळे, विनोद कांबळे, सौरभ कांबळे उपस्थित होते.

Comments
Post a Comment