गरजू रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान करा, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे.
गरजू रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान करा,
जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे.
'रक्तदान मोहिमेत रक्तदान करण्यासाठी नागरिकांनी पुढे येऊन सहभाग द्यावा.'
शिराळा - प्रतिनिधी (आनंदा सुतार)
सांगली जिल्ह्यातील गरजू रूग्णांना सुरळीत व वेळेवर रक्त मिळण्याकरिता नागरिकांनी पुढे यावे. गरजू रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान करा, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सक तथा जिल्हा कोरोना नोडल अधिकारी डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.
दरवर्षी जून ते ऑक्टोबर या काळात कॉलेजेस् व कंपन्या या ठिकाणी मोठ्या प्रमाणात रक्तदान शिबीरे होतात. परंतु यंदा कोरोना प्रार्दुभावामुळे कॉलेजेस् बंद आहेत व कंपन्या सुरू असून रक्तदान शिबीरे घेण्याची अनुकूलता नाही. सामाजिक आणि धार्मिक कार्यक्रम होत नसल्याने विविध सामाजिक संस्थाकडून होणारे उपक्रम होऊ शकले नाहीत. याचा रक्त संकलनावर परिणाम झाल्यामुळे जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा जाणवू लागला आहे. रक्तदानासाठी सद्या कोणी पुढे येत नसल्याने रक्तपेढ्यांची स्थिती गंभीर झाली आहे. थॅलेसिमिया, हिमोफिलीया, ॲनिमिया या रूग्णांबरोबरच गुंतागुतीच्या शस्त्रक्रिया, गरोदरमाता प्रसुती शस्त्रक्रिया, अपघातग्रस्त रूग्ण यांना रक्ताची गरज भासत आहे. अपेक्षित रक्त संकलन होत नसल्याने मागणी व पुरवठा यातील समतोल बिघडू लागला आहे. या करीता जिल्ह्यातील नागरिकांनी रक्तदानासाठी पुढाकार घेण्याची आवश्यकता असल्याचे जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी सांगितले.
सद्या जिल्ह्यातील 2 शासकीय व 16 खाजगी अशा एकूण 18 रक्तपेढ्या असून रक्तपेढ्यांकडे 8 ते 10 दिवस पुरेल इतकाच रक्तसाठा उपलब्ध असून गरजू रूग्णांचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान करावे. रक्तदानाबाबत अधिकाधिक जागृती निर्माण व्हावी, रक्तदान करताना आपल्या हातून एक राष्ट्रीय महान सामाजिक कार्य व रूग्णसेवा व्हावी या करीता राज्य रक्त संक्रमण परिषद, मुंबई, महाराष्ट्र राज्य यांनी 1 ऑक्टोबर राष्ट्रीय स्वैच्छिक रक्तदान दिन व त्याअनुषंगाने रक्तदान मोहिम यांचे आयोजन प्रत्येक जिल्ह्यात 1 ते ३१ ऑक्टोबर या कालावधीत केले आहे. शासकीय रक्तपेढ्यांत गरजू रूग्णांकरीता रक्तदान करण्यासाठी नागरिकांनी पुढे यावे व मोहिमेत सहभाग द्यावा (शासकीय रक्तपेढीकडे रक्तदान शिबीर आयोजन करण्याकरिता फोन नंबर 9049500097, 8999699879), असे आवाहनही जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संजय साळुंखे यांनी केले आहे.

Comments
Post a Comment