पारंपारिक खळ्यावरची भात मळणी होऊ पाहतेय दुर्मिळ. खळ्यावर पहाटेचा ऐकु येणारा सर्जा-राजाच्या घुंगरांच्या आवाजाची जागा यंत्राच्या धडधडीने घेतली.

 पारंपारिक खळ्यावरची भात मळणी होऊ पाहतेय दुर्मिळ.

 " खळ्यावर पहाटेचा ऐकु येणारा सर्जा-राजाच्या घुंगरांच्या आवाजाची जागा यंत्राच्या धडधडीने घेतली".


 शिराळा - प्रतिनिधी  (आनंदा सुतार)

एकविसाव्या शतकात जवळपास सर्वच क्षेत्रात आधुनिक तंत्रज्ञानाचा होणारा वापर कृषी क्षेत्रातही केला जात असून आता प्रतिष्ठीत बळीराजा बरोबर सामान्य बळीराजाही आधुनिक कृषी तंत्रज्ञानचा वापर करू लागल्याने पारंपरिक मशागतीच्या व काढणी मळणीच्या पध्दती ग्रामिण भागात ही दुर्मिळ होत चालल्या आहेत.

शिराळा पश्चिम भागात भात हे मुख्य पिक घेतले जाते,भाताचे आगार म्हणुनच या तालुक्याला संबोधले जाते. या पिकाच्या मळणीसाठी  माळावरच्या मोकळ्या जागेत गोलाकार खळी काडुन पाण्याने शिंपुन खुरटनी करायचीत आणि जनावरांच्या शेणांचा काला टाकुन सारवण करुन  खळे डहाळ्यानी लोटुन घ्यायची आणि खळ्यावर मध्यभागी एक लाकुड (तिवडा) रोवलेला असायचा त्या भोवताली बैल,गाय , म्हैस ही जनावरे एकाच दावणीला बांधुन तिवड्या भोवती गोल फिरवून पात हाणुन भाताची मळणी केली जात होती . आता त्याची जागा ट्रॅक्टर व मळणी मशीनने घेतली असली तरी अजूनही दुर्गम भागातील शेतकरी भात पिकाची मळणी करण्यासाठी पारंपारिक पध्दतीचा वापर करतांना दिसून येतात.

बदलत्या तंत्रज्ञानाने आपला ठसा सर्वच क्षेत्रात उमटवला आहे बळीराजाही याला अपवाद नाही नवनवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने सध्या शेती केली जात असून आता खळ्यावरील मळणी कालबाह्य होताना दिसत आहे.मळणी असो वा मशागत  सर्जा राजाची आता बळी राजाला गरज उरली नसल्याचे चित्र सर्वत्र दिसत आहे ऑक्टोबर महिना उजाडला की,बळीराजाला सुगीचे वेध लागतात पावसात थंडी वाऱ्यात कष्ट करून जोपासलेली खरीप हंगामातील पिके काढणीस आलेली असतात यामध्ये प्रामुख्याने भात, भुईमूग, सोयाबीन, ज्वारी या पिकांचा समावेश असतो पूर्वी  शेत शिवारात काढणीसाठी माणसांची लगबग दिसायची आता काळ बदलला शेती कसण्याची मानसिकता कमी झाली परिणामी शेतातील मनुष्यबळ कमी झाले पिकाची मशागत , पेरणी,काढणी व मळणी या कामांची जागा यंत्राने  घेतली अंग मेहनतीने केली जाणारी सर्व कामे यंत्राने होऊ लागली एवढेच काय तण भांगलणी साठीही महीलांची गरज राहीली नाही त्याची जागाही तण नाशकांनी घेतली! बहुतेक ठिकाणी पैरा पद्धत जवळजवळ बंद होत आली आहे. पारंपारिक पद्धतीने भात काढण्या बरोबर  मळण्याची पद्धत दिसेनाशी झाली असुन  दिवसभर कापलेल्या भाताच्या काडाची खळ्याच्या कडेला बुचाड रचायची पहाटेच्या पडलेल्या  मंद चांदण्याच्या प्रकाशात आणि तिवड्याला बांधलेल्या कंदीलाच्या साक्षीने दिवसभरात काढलेल्या भाताची मळणी करायची. सकाळी खळ्यावरच दुधाचा चहा यायचा आणि सकाळच्या उन्हात पिंजर पसरायचे खळ्यावर भात वाढवायचे भर दुपारी पसरलेले पिंजर हलवायचे  यासाठी चिव्याची एका नांग्याची आकडी असायची दुपारी महिलांनी भाताला वारे द्यायचे व पुरुष मंडळीनी वाळलेल्या पिंजरा ची व्हळी रचायची सायंकाळपर्यंत असा दिनक्रम चालायचा  काळानुरूप मनुष्यबळ कमी झाले पर्यायाने तंत्रज्ञानआले अणं खळ्यावर भात मळण्याचे चित्र दिसेनासे झाले आणि त्या ठिकाणी यंत्राची धडधड ऐकायला येऊ लागली आणि या घडीला गावगाड्यातील खळी दुर्मीळ झालीत .






Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .