कारगिल योध्दा प्रल्हाद ( आबा) फौजींची अकाली एक्झिट.

 कारगिल योध्दा प्रल्हाद ( आबा) फौजींची अकाली एक्झिट.

सर्वांना हास्य विनोदात मनमुराद हसवणारा अजातशत्रू भारतमातेचा सुपुत्र अनंतात विलीन...

शिराळा -प्रतिनिधी.

करमाळे (ता शिराळा) येथील  सीमा सुरक्षा दलातील हवालदार प्रल्हाद राजाराम पाटील  (वय ४८) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. 

  बी. एस. एफच्या गार्डदलाने मानवंदना देत शासकीय इतमामात त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले.

त्यांच्या पश्चात आई,  दोन भाऊ, पत्नी, मुलगा, मुलगी असा मोठा परिवार आहे. रक्षा विसर्जन गुरुवार दिनांक ७ रोजी आहे.

श्रीकमला माधव‌ विद्यामंदिर गुढेचे मुख्याध्यापक एस. आर. पाटील यांचे ते कनिष्ठ बंधू होत.

    १९९४ साली त्यांनी सैन्यदलात प्रवेश केला. राजस्थान, पंजाब, श्रीनगर, ग्वाल्हेर, आसाम,मिझोराम, नागालँड, मणिपूर, गुजरात आदी राज्यांत देशाच्या सीमेवर सेवा केली. सध्या ते पश्चिम बंगाल येथे कार्यरत होते. नुकतेच त्यांना प्रमोशन मिळाले होते. सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर बढती होऊन त्यांचे पोस्टिंग सिलीगुडी पश्चिम बंगाल येथे झाले होते. हजर होण्यासाठी मागील महिन्यात ते गुजरात हेडक्वार्टर वरून प. बंगालला निघाले होते. खराब हवामानामुळे रस्तात त्यांचे पंधरा दिवस गाडीतच गेले. या कालावधीत बाहेर पडणारा बर्फ, हुडहुडी भरवणारी थंडी, धुके यामुळे तब्येत बिघडली. याकाळात पिण्याचे पाण्याचे सुध्दा बर्फ झाल्यामुळे बर्फ वितळून पाणी प्यावे लागले. याचा परिणाम शरीरावर झाला. तिथुन परत त्यांना मुलगा पवनने खाजगी गाडीने गुजरातला नेऊन अॅडमिट केले. प्रकृती सुधारली होती. पण विश्रांतीची गरज होती. त्यांनी मायभूमीची ओढ धरली व गावी परतले. गावी व्हायलर इन्फेक्शन होऊन रोग प्रतिकार शक्ती कमी झाली. त्यातच काळाने डाव साधला.

त्यांच्या निधनाने संपूर्ण गावावर शोककळा पसरली. त्यांच्या अंत्ययात्रेत संपूर्ण गाव व नातेवाईक, माजी सैनिक संघटना पदाधिकारी सहभागी झाले होते.

कारगिल युध्दात सहभाग.

१९९९ साली झालेल्या कारगिल युध्दात त्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेतला होता. त्यावेळी त्यांच्या डाव्या हाताला गोळी लागून जखमी झाले होते. 

भारत मातेच्या या वीरपुत्राला भावपूर्ण श्रध्दांजली.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .