भाषिक कौशल्ये यशस्वी होण्याची स्वप्ने पूर्ण करतात.
भाषिक कौशल्ये यशस्वी होण्याची स्वप्ने पूर्ण करतात.
_________ प्रा. संभाजी देसाई.
सातारा - प्रतिनिधी.
भाषा बोलता येते म्हणून बोलणे व हृदयातील भाव-भावना, विचार व सूचना प्रभावात्मक पद्धतीने समोरच्यापर्यंत पोहोचविणे यांमध्ये फरक असतो. भाषा शिकताना ऐकणे, बोलणे व लिहिणे या क्रमाने शिकली तर भाषेची जाणं येणे सुलभ होते. रोजच्या व्यावहारिक जीवनात बोलण्यातील कौशल्ये यशस्वी होण्यास मदत करतात. भाषेच्या विद्यार्थ्यांना भाषा कौशल्यातील वाचन , लेखन, चिंतन व संभाषणातील बारकावे माहित असणे आवश्यक आहे. कोणत्याही हाती घेतलेल्या कार्यावरील निष्ठा, श्रम व भाषिक कौशल्ये माणसाच्या यशस्वी होण्याचे स्वप्न पूर्ण करण्यात महत्त्वपूर्ण भूमिका निभावतात. असे विचार ब्राईट फ्युचर अकॅडमीचे संचालक प्रसिद्ध वक्ते प्रा. संभाजी देसाई यांनी व्यक्त केले. ते सातारा येथील कर्मवीर भाऊराव पाटील विद्यापीठाचे घटक महाविद्यालय छत्रपती शिवाजी कॉलेज मधील हिंदी विभागाच्या वतीने बी.ए. भाग -1 व एम. ए. भाग -1 च्या विद्यार्थ्यांच्या स्वागत समारंभा वेळी 'भाषा कौशल और जीवन शिक्षण' या विषयावर आयोजित विशेष व्याख्यान कार्यक्रमात बोलत होते. अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेंद्र मोरे होते.
प्रा. देसाई पुढे म्हणाले की जीवन शिक्षणात आई -वडिल व गुरूला सर्वोच्च स्थान असायला हवे. ज्ञान ,कौशल्य, माहिती व प्रतिभा हे शिक्षण व्यवस्थेतील महत्त्वाचे चार स्तंभ आहेत. विद्यार्थ्याला स्वतःला ओळखता यायला हवे. आजच्या युगात अस्सल ज्ञान प्राप्त करण्याचा प्रयत्न हवा. कॉपी पेस्टच्या जमान्यात मूळ कौशल्यांची चोरी करता येत नाही. जीवनातील चांगले - वाईट प्रसंग, ग्रंथ, शिक्षक ,यशस्वी - अयशस्वी माणसे , सिनेमा , नाटक व साहित्य महत्त्वपूर्ण संदेश देतात. संबंधित वेळी संदेश ओळखता येणे व त्यानुरूप व्यवहार करणे आवश्यक आहे. हिंदी भाषेमधून करिअरच्या अनेक संधी आहेत.
अध्यक्षीय विचार व्यक्त करताना डॉ. राजेंद्र मोरे यांनी सांगितले की वर्तमान काळात कौशल्य शिक्षणाला महत्त्व आले आहे. विद्यार्थ्यांना मूल्य शिक्षण व कौशल्य शिक्षण देणे गरजेचे आहे. भाषा व्यक्त होण्याचे साधन आहे मात्र भाषा बोलताना शब्दांची व शैलीची निवड महत्त्वपूर्ण असते. कोणत्या प्रसंगात, कोणत्या वेळी, कोणते शब्द वापरायचे याचे ज्ञान व समज असायला हवी. नोकरी, व्यवसाय, उद्योग,समाज व कुटुंब या सर्व ठिकाणी भाषिक कौशल्ये असणारा माणूस यशस्वी होताना दिसतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक समन्वयक डॉ. संदीप किर्दत यांनी केले. स्वागत हिंदी विभाग प्रमुख प्रो.(डॉ.) सविता मेनकुदळे यांनी केले. पाहुण्यांची ओळख डॉ. प्रदीप शिंदे यांनी करून दिली. आभार प्रा. सोमनाथ कोळी यांनी मानले. सूत्रसंचालन कु. सानिध्या पवार हिने केले. यावेळी विद्यार्थ्यांनी गीत - गायन, नृत्य ,कविता व शेर- शायरीचे सादरीकरण केले. कार्यक्रमास उपप्राचार्य डॉ. अनिलकुमार वावरे , डॉ. रोशनआरा शेख, डॉ. रामराजे माने -देशमुख यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी डॉ. सादिक तांबोळी , श्री राहुल कोळी, विशाल देसाई यांचेसह हिंदी विभागाचे विद्यार्थी बहुसंख्येने उपस्थित होते.


Comments
Post a Comment