कराड मध्ये इफको नॅनो युरिया(द्रवरूप) विक्री शुभारंभ उत्साहात संपन्न.

 कराड मध्ये इफको नॅनो युरिया(द्रवरूप) विक्री शुभारंभ उत्साहात संपन्न.


   कराड - प्रतिनिधि,

इंडियन फार्मर फर्टिलायझर्स को-ऑपरेटिव लिमिटेड व कराड तालुका सहकारी खरेदी विक्री संघ लिमिटेड कराड यांच्या संयुक्त विद्यमाने इफको नॅनो युरिया (द्रवरूप) विक्री शुभारंभ कराड येथे खरेदी विक्री संघ मार्केट यार्ड येथे संपन्न झाला हा कार्यक्रम मा. श्री.शंभूराज देसाई ग्रामीण वित्त नियोजन पणन राज्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या शुभहस्ते व मा. श्री. पृथ्वीराज चव्हाण बाबा माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य यांच्या अध्यक्षतेखाली तसेच मा. श्री सारंग पाटील बाबा प्रदेशाध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस आय.टी. सेल महाराष्ट्र राज्य व मा. अँड. श्री. उदयसिंह पाटील दादा सरचिटणीस महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

या कार्यक्रम प्रसंगी बोलताना माननीय नामदार श्री शंभूराज देसाई साहेब म्हणाले,जगामध्ये सर्वप्रथम नॅनोटेक्नॉलॉजी युक्त नॅनो युरिया खत इफको या सहकारी संस्थेने संशोधन करून विक्रीस उपलब्ध करून दिल्याने पर्यावरणाचे संरक्षण होऊन नत्र या अन्नद्रव्याचे अधिक कार्यक्षम पद्धतीने शिकामार्फत शोषण होईल. त्यामुळे कमी खर्चामध्ये शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढण्यास मदत होईल. तसेच स्व. विलासकाका पाटील-उंडाळकर यांच्या आशीर्वादाखाली आणि ॲड. उदयसिंह दादा यांच्या मार्गदर्शनाखाली यशाची नवनवीन शिखरे पादाक्रांत करीत असलेला कराड तालुका खरेदी विक्री संघामार्फत होणाऱ्या शेतकरी सेवेची स्तुती केली.

माननीय आमदार श्री पृथ्वीराज चव्हाण बाबा यांनी सहकार तत्वावर चाललेल्या इफको संस्थेमार्फत नवनवीन कृषी उत्पादने माफक किमतीमध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध करून दिल्याबद्दल इफको संस्थेचे अभिनंदन केले. तसेच इफको नॅनो युरिया द्रवरूप कराड तालुक्यामध्ये आणि सातारा जिल्ह्यामध्ये शेतकऱ्यांच्या सेवेसाठी उपलब्ध करून दिल्याबद्दल इफको संस्थेचे आणि कराड संघाचे अभिनंदन केले. तसेच फक्त रासायनिक खतावर अवलंबून न राहता समतोल खतांचा वापर शेतकऱ्यांनी करावा असे आवाहन केले.

माननीय श्री सारंग पाटील बाबा यांनी नॅनो युरिया द्रवरुप या खताचे शेतकऱ्यांना महत्त्व पटवून देत नवनवीन तंत्रज्ञानाचा अवलंब शेतकऱ्यांनी केला पाहिजे असे आवाहन केले.

माननीय श्री यु आर तिजारे, राज्य विपणन प्रबंधक, महाराष्ट्र व गोवा, यांनी नॅनो युरिया द्रवरूप बद्दल सविस्तर माहिती शेतकऱ्यांना दिली. नॅनो युरिया द्रवरूप हा दाणेदार युरिया पेक्षा तिप्पट जास्त कार्यक्षम असून माती, हवा व पाणी यांचे होणारे प्रदूषण रोखणारा आहे. तसेच तो दाणेदार युरिया पेक्षा दहा टक्के कमी किमतीमध्ये शेतकऱ्यांना उपलब्ध होणार अशी माहिती दिली.

माननीय श्री हनमंतराव चव्हाण, आर.जी.बी. सभासद इफको नवी दिल्ली, यांनी इफको संस्था आणि कराड संघामार्फत होणाऱ्या शेतकरी सेवेची माहिती दिली तसेच इफकोच्या खतांवर शेतकऱ्यांसाठी मोफत अपघाती विमा असल्याचा उल्लेख केला.

तसेच अँड. उदयसिंह पाटील दादा म्हणाली की, खरेदी-विक्री संघांमध्ये इफको नॅनो युरिया सातारा जिल्ह्यातील कराड तालुक्यात पहिल्यांदाच विक्रीसाठी उपलब्ध झाला असून शेतकऱ्यांनी याचा लाभ घेऊन आपली आर्थिक प्रगती साधावी. तसेच द्रवरूप युरिया मुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक बचत होऊन जास्तीत जास्त शेतीतून उत्पन्न घेण्यास मदत होईल.

तसेच या कार्यक्रमांमध्ये कराड तालुका खरेदी विक्री संघाच्या सर्व शाखांसाठी प्रत्येकी एक स्प्रेयर इफको संस्थेमार्फत देण्यात आला. या स्प्रेयरचा शेतकऱ्यांना मोफत लाभ मिळणार आहे. तसेच अत्याधुनिक नॅनो तंत्रज्ञान युक्त इफको नॅनो युरिया द्रवरूप आणि सागरिका द्रवरूप या खतांची ऊस पिकावर एकत्रित फवारणी नवीन तंत्रज्ञानायुक्त ड्रोन मार्फत करून शेतकऱ्यांना प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.

या कार्यक्रम प्रसंगी खरेदी-विक्री संघाचे चेअरमन मा. श्री. रंगराव थोरात यांनी कराड तालुका खरेदी-विक्री संघाचा थोडक्यात लेखाजोखा सांगितला तसेच रासायनिक खते व नामवंत कंपनीची डीलरशिप आपल्या संघांमध्ये असल्याचे ही सांगितले. त्याचबरोबर दर्जेदार रासायनिक खते व विद्राव्य खते विक्रीसाठी उपलब्ध असल्याचेही त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाचे इफको नॅनो युरिया बाबत कंपनी अधिकारी श्री .तिजारे साहेब यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी त्यांनी इफको नॅनो युरिया (द्रवरूप) यांच्याविषयी माहिती देऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच मान्यवर पाहुण्यांच्या उपस्थितीत प्रगतशील शेतकऱ्यांना नॅनो युरिया द्रवरूप याचे वाटप करण्यात आले .तसेच इफको नॅनो युरिया (द्रवरूप) बॉटलमध्ये कराड तालुक्यातील खरेदी- विक्री संघामध्ये विक्रीसाठी उपलब्ध असल्याचे सांगितले तसेच याचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले.

या कार्यक्रमास मलकापूर नगराध्यक्ष निलिमा येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, रयत कारखान्याचे अध्यक्ष आप्पा गरुड, शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, कोयना दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, शामराव पाटील पतसंस्थेचे चेअरमन पाटील गुरुजी, कोयना बँकेचे चेअरमन रोहित पाटील, प्राध्यापक धनाजी काटकर सर, आर. जी.बी. सदस्य हणमंतराव चव्हाण तसेच संस्थेचे पदाधिकारी व कराड तालुक्यातील शेतकरी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र जाधव यांनी केले तर आभार इफको फील्ड ऑफिसर संदीप रोकडे यांनी केले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .