जयवंतराव भोसले यांचा स्मृतिदिन प्रेरणादिन म्हणून साजरा व्हावा : अरुण रोडे.
जयवंतराव भोसले यांचा स्मृतिदिन प्रेरणादिन म्हणून साजरा व्हावा : अरुण रोडे.
कराड, ता, ६ : जनसेवा हीच ईश्वरसेवा हे ब्रीद घेऊन अखंड आयुष्य जगलेल्या सहकारमहर्षी जयवंतराव भोसले आप्पासाहेबांनी कृष्णाकाठच्या शेतकऱ्यांच्या जीवनात विकासाची गंगा आणली. सहकारातून ग्रामविकास केला. त्यांचे कार्य खऱ्या अर्थाने भगिरथ कार्य आहे. त्यांनी आपल्या कार्यातून समाजाला अखंड प्रेरणा देण्याचे काम केले असून, त्यांचा स्मृतिदिन हा प्रेरणादिन म्हणून साजरा व्हायला हवा, असे प्रतिपादन सहकार व ज्येष्ठ नागरिक चळवळीतील ज्येष्ठ नेते अरुण रोडे यांनी केले. सहकारमहर्षी स्व. जयवंतराव भोसले यांच्या ९ व्या स्मृतिदिनानिमित्त कृष्णा हॉस्पिटलच्या सभागृहात आयोजित व्याखानात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी कराड येथील सुप्रसिद्ध व्यावसायिक सुभाष वाडीलाल शहा होते.
सहकारमहर्षी जयवंतरावजी भोसले (आप्पा) स्मारक समिती, अतुल भोसले युवा प्रतिष्ठान व कृष्णा उद्योग समूहातील सर्व संस्थांच्यावतीने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमाच्या व्यासपीठावर य. मो. कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले, डॉ. दौलतराव आहेर इंजिनिअरिंग कॉलेजचे संस्थापक डॉ. अशोक गुजर, कराडच्या नगराध्यक्षा सौ. रोहिणी शिंदे, लोकशाही आघाडीचे गटनेते सौरभ पाटील, धनलक्ष्मी पतसंस्थेचे अध्यक्ष दिलीप चव्हाण प्रमुख उपस्थित होते.
याप्रसंगी ‘ज्येष्ठ नागरिकांच्या समस्या व उपाय’ या विषयावर बोलताना श्री. रोडे म्हणाले, की ज्येष्ठ नागरिकांसाठी शासनाने अनेक लाभाच्या योजना सुरु केल्या आहेत. पण जाचक अटींमुळे त्याचा लाभ ज्येष्ठांना मिळत नाही. ज्येष्ठ नागरिकांना प्रवास, आरोग्यसुविधा यासाठी सवलती मिळाव्यात यासाठी आमचा संघर्ष सुरु असून, यासाठी सामान्य नागरिकांनीही सहकार्य करण्याची गरज आहे.
अध्यक्षस्थानावरुन बोलताना श्री. शहा म्हणाले, जयवंतराव भोसले आप्पा हे कृष्णाकाठचे युगपुरुष आहेत. आप्पांनी सहकाराच्या माध्यमातून अनेक संस्था उभ्या केल्याने रोजगार वाढले. उद्योगधंद्यांना चालना मिळाली. साहजिकच लोकांची क्रयशक्ती वाढल्याने, आप्पांमुळे खऱ्या अर्थाने कराडची पेठ श्रीमंत झाली. कृष्णा हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांनी या भागातील दुःखी लोकांचे अश्रू पुसण्याचे व त्यांना धीर देण्याचे महत्वाचे काम केले आहे.
आप्पांनी स्थापन केलेल्या सर्वच संस्था प्रगतीपथावर असून, लोकविकासात व ग्रामविकासात योगदान देत असल्याचे डॉ. सुरेश भोसले यांनी यावेळी आपल्या भाषणात नमूद केले.
यावेळी प्राचार्य हणमंत कराळे यांनी ‘आदरणीय आप्पासाहेब’ ही कविता सादर केली. कृष्णा कारखान्याचे संचालक श्रीरंग देसाई यांनी प्रास्तविक केले. रामभाऊ सातपुते यांनी सूत्रसंचालन केले. पंचायत समिती सदस्य बाळासाहेब निकम यांनी आभार मानले. कार्यक्रमाला श्री. पृथ्वीराज भोसले, श्री. विनायक भोसले, लोकशाही आघाडीचे अध्यक्ष जयंत पाटील, नगरसेवक सुहास पवार, अख्तर आंबेकरी, शिवाजी पवार, गंगाधर जाधव, जयंत बेडेकर, कृष्णा चॅरिटेबल ट्रस्टचे विश्वस्त जयवंतराव जगताप, शिवाजीराव थोरात, सर्जेराव गुंडा पाटील, रघुनाथ मोहिते, भाजपाचे तालुकाध्यक्ष धनंजय पाटील, डॉ. सारिका गावडे, जे. पी. देसाई, शशांक पालकर यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी, कर्मचारी आणि कराड व वाळवा तालुक्यातील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment