महाविद्यालयीन विविध स्पर्धातून मिळालेले यश विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा मोठा ऊर्जा स्त्रोत.

 महाविद्यालयीन विविध स्पर्धातून मिळालेले यश विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा मोठा ऊर्जा स्त्रोत ___ मा. बिपीन मोरे.


 
कराड - प्रतिनिधी.  

श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे दिनांक 12 जानेवारी पासून सुरू असणाऱ्या श्री स्वामी विवेकानंद जयंती सप्ताहातील विविध स्पर्धांचा आज पारितोषिक वितरण समारंभ महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघाने आयोजित केला होता. या समारंभाचे प्रमुख पाहुणे मा. बिपिन मोरे गटशिक्षणाधिकारी, पंचायत समिती कराड हे होते. आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, महाविद्यालयीन विविध स्पर्धातून मिळालेले यश विद्यार्थ्यांच्या जडणघडणीचा मोठा ऊर्जा स्त्रोत आहे. पूर्वीची शिक्षण पद्धती व आजची शिक्षण पद्धती यात अमुलाग्र बदल झाला आहे. ऑनलाइन शिक्षण पद्धतीने विद्यार्थी ठराविक चौकटीत शिकत जातो परंतु ऑफलाइन शिक्षणाने विद्यार्थ्यांच्यात अनेक गुण प्रत्यक्ष रुजवले जातात. विवेकानंद सप्ताहासारख्या विविध उपक्रमामुळे विद्यार्थ्यांच्या मनात सुसंस्कार कोरले जातात.  स्पर्धेतील प्रयत्नामुळे विद्यार्थ्यांच्यात जबाबदारीची जाणीव निर्माण होते. आज माजी विद्यार्थी संघाने हा पारितोषिक वितरण समारंभ आयोजित केला हा स्तुत्य उपक्रम आहे. विद्यार्थी कधीही माजी होत नाही. तो नेहमी आजी विद्यार्थ्यांना प्रेरणादायी असतो. विद्यार्थीदशेत कष्ट केले की भविष्यात नक्कीच चांगले दिवस येतात. त्यामुळे विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर कमी करून आपला वेळ ग्रंथ वाचनात घालवावा.

                  कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो.डॉ.सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, माजी विद्यार्थी संघ हा महाविद्यालयाचा आत्मा असतो. महाविद्यालयाच्या स्थापनेच्या पहिल्या दुसऱ्या बॅचचे विद्यार्थी देखील आज महाविद्यालयाच्या विकासासाठी धडपडत आहेत. मोठ मोठ्या पदावरती ते विराजमान आहेत. राजकीय, शैक्षणिक, सामाजिक, सर्व क्षेत्रात आपल्या महाविद्यालयाचे विद्यार्थी आहेत. याचा मला अभिमान आहे.

                    माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष मा. प्रमोद सुकरे यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी मा. नितीन ढापरे, यांची शेती उत्पन्न बाजार समिती कराड येथे उपसभापती पदावरती निवड झाल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच मा. विजय वाटेगावकर नुकत्याच झालेल्या कराड नगरपालिकेच्या निवडणुकीत नगरसेवक म्हणून निवडून आल्याबद्दल सत्कार करण्यात आला. तसेच माननीय संभाजी साळवे संचालक सह्याद्री सहकारी साखर कारखाना यशवंत नगर यांचाही सत्कार करण्यात आला. या सर्व सत्कारमूर्तींनी मनोगते व्यक्त केली व जुन्या आठवणींना उजाळा दिला.

         कार्यक्रमाचे प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय माजी विद्यार्थी संघाचे उपाध्यक्ष मा. माणिक डोंगरे यांनी केला. आभार प्रा. सुरेश रजपूत यांनी मानले. सूत्रसंचालन प्रा. विश्वनाथ सुतार व डॉ. शितल गायकवाड यांनी केले. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी प्रा. संभाजी पाटील, डॉ. सुभाष कांबळे डॉ. मारुती सूर्यवंशी, प्रा. अण्णासाहेब पाटील, प्रा. सुरेश यादव,प्रा. विनायक जाधव, प्रा. शैला चोबे, प्रा. शितल सालवाडगी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमासाठी आजी-माजी विद्यार्थी विद्यार्थिनी व गुरुदेव कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .