ग्रामीण उद्योजकतेच्या माध्यमातून युवकांना व्यवसाय उद्योगाच्या संधी - डॉ. आशा सावंत.

 ग्रामीण उद्योजकतेच्या माध्यमातून  युवकांना व्यवसाय उद्योगाच्या संधी - डॉ. आशा सावंत.


 
कराड - प्रतिनिधी.

  श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित,शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय, कराड येथे अर्थशास्त्र विभागाच्या वतीने 'ग्रामीण उद्योजकता: एक संधी' या विषयावर विशेष व्याख्यान आयोजित केले होते.  त्याप्रसंगी साधन व्यक्ती म्हणून मार्गदर्शन करताना डॉ. आशा सावंत म्हणाल्या की, ग्रामीण उद्योजकतेच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना रोजगाराच्या अनेक संधी उपलब्ध आहेत.विद्यार्थ्यांनी  केवळ नोकरीच्या शोधात न राहता उद्योग व्यवसाय यामध्ये लक्ष केंद्रित करावे. यातील विशेष कौशल्य ज्ञान प्राप्त करून उद्योग व्यवसाय स्थापन केले तर ते स्वतः बरोबरच इतरांना सुद्धा रोजगार देतील त्यामुळे ग्रामीण भागाचा विकास होईल. राष्ट्र विकासात भर पडेल. ग्रामीण भागातील लोकांच्या गरजा त्यांना आवश्यक असणाऱ्या वस्तू व सेवा याची माहिती घेऊन त्या प्रकारचे उत्पादन घेतल्यास त्या मालाला निश्चित मागणी राहील.  तुमचा उद्योग व्यवसाय यशस्वी होईल. त्याकरिता शासन देखील अनेक योजनांतर्गत उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अनुदान देत आहे. त्याची माहिती देखील विद्यार्थ्यांनी घेणे आवश्यक आहे. उद्योग व्यवसायाचे योग्य ज्ञान, विशेष कौशल्य, भाषेचे ज्ञान, व्यवस्थापनाचे ज्ञान, संघटन कौशल्य आपणाकडे असेल तर आपण उत्तम व्यवसाय करू शकतो असे  प्रतिपादन त्यांनी  केले.

तसेच त्यांनी ग्रामीण भागामध्ये आपण कोणते गृहोद्योग, लघुउद्योग सुरू करू शकतो याची अनेक उदाहरणे देऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहित केले. आपला देश अनेक खेड्यांनी मिळून बनलेला आहे त्यामुळे खेड्यांचा विकास म्हणजेच देशाचा विकास म्हणून युवकांनी ग्रामीण भागामध्ये उद्योग व्यवसाय विकसित केले पाहिजेत. 

          कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ) सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्षीय मनोगतात ते म्हणाले, विद्यार्थ्यांनी उद्योग व्यवसायाचे ज्ञान आत्मसात करून उद्योग व्यवसाय जर सुरू केले तर ते नक्कीच यशस्वी होतील. केवळ नोकरीसाठी शिक्षण नसते. घेतलेल्या शिक्षणाचा वापर विद्यार्थ्यांनी उद्योग व्यवसायासाठी केला तर ते नक्कीच यशस्वी होतील. ग्रामीण जीवनाशी निगडित शेती उत्पादने, कृषी पर्यटन, फळबागा वरती आधारित औषधे, सेंद्रिय खतांचे उत्पादन अशा विविध व्यवसायात अनेक उद्योजक उतरलेले आहेत व ते यशस्वी देखील झालेले आहेत यांचा आदर्श घ्यावा.                           

            या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अर्थशास्त्र विभाग प्रमुख डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी केले.प्रमुख पाहुण्यांचा परिचय डॉ. सारिका लाटवडे यांनी केला. या कार्यक्रमाचे आभार प्रा. संदीप तुपे यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रा. जयदीप चव्हाण यांनी केले. या कार्यक्रमाला अनेक विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .