राष्ट्रभिमानाची तेजोमय फडकती पताका म्हणजे श्री स्वामी विवेकानंदांची विचारधारा.
राष्ट्रभिमानाची तेजोमय फडकती पताका म्हणजे श्री स्वामी विवेकानंदांची विचारधारा.
________मा.ॲड.संभाजी मोहिते
कराड - प्रतिनिधी.
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे दिनांक 12 जानेवारी पासून श्री स्वामी विवेकानंद सप्ताह सुरू आहे. सप्ताहातील दुसरे पुष्प गुंफण्यासाठी "श्री स्वामी विवेकानंद तुमचे आणि आमचे" या विषयावरती मार्गदर्शन करताना प्रमुख व्याख्याते ॲडव्होकेट मा.संभाजी मोहिते म्हणाले, राष्ट्र अभिमानाची तेजोमय फडकती पताका म्हणजे श्री स्वामी विवेकानंदांची विचारधारा आहे विवेकानंद हे व्यक्तिमत्त्वच असे आहे कोणत्याही एका चौकटीत त्यांच्या विचारांना बंदिस्त करता येत नाही. बंधू भावाची शिकवण देणारे सर्वधर्मसमभावाची बीजे पेरणारे, राष्ट्रीयत्वाची भावना जपून युवकांना दिशा देणारे, असे थोर व्यक्तीमत्व आहे. एका जातीपुरते, धर्मापुरते त्यांचे कार्य मर्यादित नसून समग्र हिंदुस्तान ची महती सांगणारे त्यांचे ज्ञान आहे. लहानपणापासूनच कष्टाळू चिकित्सक वृत्तीचे विवेकानंद कर्मकांड जातीयता न मानणारे होते. अवघ्या 39 वर्षाच्या आयुष्यात साधी राहणी आणि उच्च विचार त्यांनी जपले. माणूस माणसाशी जोडला गेला पाहिजे असे त्यांचे मत होते. अमेरिकेत त्यांची भाषणे खूप गाजली. परदेशात देखील तेथील धर्मप्रसारकांना सांगितले, धर्माचा प्रसार बंदुकीच्या गोळीवर करता येत नाही. विवेकानंदांच्या पश्चात भगिनी निवेदिता यांनी विवेकानंदांचे कार्य पुढे चालू ठेवले.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते. आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे यांना रामानंद भारती यांनी एका महाविद्यालयास विवेकानंदांचे नाव द्यावे असे सांगितले. उदात्त विचारसरणीच्या बापूजींनी संपूर्ण शिक्षण संस्थेचे नाव श्री स्वामी विवेकानंद ठेवले. अशी उदारता अलीकडे आढळत नाही. आज या सप्ताहाच्या निमित्ताने प्रमुख पाहुण्यांनी अतिशय उत्कृष्टपणे आपल्यासमोर विवेकानंदांचे कार्य उभे केले. विवेकानंदांच्या आपण सर्वांनी वाटचाल केली पाहिजे.
या कार्यक्रमासाठी ज्येष्ठ साहित्यिक अरुण काकडे, प्रा.सुरेश रजपूत प्राध्यापक विश्वनाथ सुतार उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. सुरेश यादव यांनी केले. पाहुण्यांचा परिचय डॉ. सुभाष कांबळे यांनी केला. डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी आभार व्यक्त केले. सूत्रसंचालन प्राध्यापक मनाली रानडे यांनी केले . कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी श्री सुनील गुजर व श्री प्रकाश पाटील यांनी सहकार्य केले.या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी सर्व गुरुदेव कार्यकर्ते बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment