महिला महाविद्यालय, कराड येथे ‘वाचन संस्कृतीचा विकास’ या विषयावर परिसंवाद.
महिला महाविद्यालय, कराड येथे ‘वाचन संस्कृतीचा विकास’ या विषयावर परिसंवाद.
कराड - प्रतिनिधी.
कराड येथील शिक्षण मंडळ, कराड संचालित महिला महाविद्यालयाच्या मराठी विभागाच्या वतीने मराठी भाषा संवर्धन पंधरवड्यानिमित्त बुधवार, दि. २८ जानेवारी २०२६ रोजी ‘वाचन संस्कृतीचा विकास’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले.
कार्यक्रमाची सुरुवात मान्यवरांच्या हस्ते कुंडीतील रोपास जल अर्पण करून करण्यात आली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मराठी विभागप्रमुख प्रा. विलास सुर्वे यांनी केले.
या परिसंवादात प्रमुख वक्ते मा. श्री. अरुण काकडे यांनी मराठी भाषा दिनाच्या अनुषंगाने वाचन करताना कोणत्या गोष्टी पाळाव्यात आणि कोणत्या टाळाव्यात, याविषयी मार्गदर्शन केले. कावळ्याच्या प्रतीकात्मक उदाहरणाद्वारे त्यांनी आपले विचार मांडले. कावळ्याने स्पर्श केल्याशिवाय पिंडाला मुक्ती मिळत नाही, या लोकमान्य संकल्पनेचा संदर्भ देत वाचनालाही तितकेच संवेदनशील, सजग आणि अर्थपूर्ण असणे आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. कावळा आणि काळा रंग यांचे संकेत, विध्वंस आणि जागृती यांचे प्रतीक कसे घडते, हे त्यांनी विविध उदाहरणांद्वारे विद्यार्थिनींना समजावून सांगितले.
खरा वाचक कोण असतो आणि तो कशा पद्धतीने वाचन करतो, यावर भाष्य करताना त्यांनी साहित्य कोणत्याही एका भाषेपुरते मर्यादित न ठेवता सर्व भाषांच्या साहित्याचा स्पर्श केल्यास वाचन अधिक समृद्ध होते, असे मत मांडले. पिढ्यानपिढ्या जतन झालेल्या धर्मग्रंथांमधून समाजाची वैचारिक बैठक घडत आली असून पुराणे, चक्रधरांचे लेखन, माहीमभट्ट,बायबल, हदीस आणि कुराण यांसारख्या ग्रंथांचे उदाहरण देत त्यांनी विद्यार्थिनींना व्यापक वाचनाची दिशा दिली.
वाचनाची सुरुवात अंकलिपीपासून होते, असे सांगत त्यांनी चांदोबा, किशोर, शिकारी कथा, जादूच्या कथा, तसेच शालेय जीवनातील बालभारती, कुमारभारती यांचा उल्लेख केला. कुमारवयात कापूरकर यांच्या लेखनातून येणाऱ्या अनुभवांचा संदर्भ त्यांनी दिला. श्रीम. माटे आणि अण्णाभाऊ साठे यांचे साहित्य आपण सखोलपणे वाचल्याचे त्यांनी सांगितले. अण्णाभाऊ साठे हे आपले आवडते लेखक असून त्यांच्या तेरा कथासंग्रह व कादंबऱ्या आपण वाचल्याचे त्यांनी नमूद केले.
साहित्याचा उद्योग यशस्वी होण्यासाठी काय वाचावे, यावर भाष्य करताना समाजाचा भूतकाळ न सांगता वर्तमानाचे भान देणारे आणि भविष्य घडवणारे साहित्य वाचक घडवते, असे त्यांनी सांगितले. आशादेवी यांच्या पुस्तकांचा संदर्भ देत साहित्य कसे प्रेरणादायी असावे, हे त्यांनी स्पष्ट केले. ‘रिंगण’, ‘स्टारफुल' नायक’, ‘एक भाकरी तीन चुली’ यांसारख्या साहित्यकृतींचा उल्लेख करत त्यांनी आपल्या सखोल वाचनाचा परिचय दिला.
प्रतिभा कणेकर या त्यांच्या आवडत्या लेखिका असल्याचेही त्यांनी नमूद केले. तसेच तेलुगू भाषेतील साहित्य वाचल्याचा अनुभव सांगताना मानवी मनाचे विश्लेषण करण्याची क्षमता तेलुगू भाषेत विशेषत्वाने आढळते, असे मत त्यांनी व्यक्त केले.
आपल्या मार्गदर्शनाच्या शेवटी त्यांनी विद्यार्थिनींना महत्त्वाचा सल्ला दिला की, केवळ एमपीएससी, यूपीएससी परीक्षांच्या चौकटीत अडकून न राहता सखोल वाचनाकडे वळावे, वैचारिक बैठक पक्की करावी आणि उत्तम वाचक कौशल्य आत्मसात करावे.
कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ. भरत बजरंग बल्लाळ यांनी वाचनसंस्कृती जोपासण्याचे महत्त्व अधोरेखित केले. यावेळी उपप्राचार्य डॉ. पराग सोनटक्के प्रमुख उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. रेखा शशिकांत धुळप यांनी केले, तर सौ. कांचन कृष्णत थोरात यांनी आभार मानले. परिसंवाद अत्यंत विचारप्रवर्तक वातावरणात पार पडला.

Comments
Post a Comment