विकसित भारताच्या उभारणीसाठी राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट साधन-: डॉ. अभय कुमार पाटील.
विकसित भारताच्या उभारणीसाठी राष्ट्रीय सेवा योजना उत्कृष्ट साधन-: डॉ. अभय कुमार पाटील.
कराड - प्रतिनिधी.
श्री. स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था संचलित शिक्षणमहर्षी बापूजी साळुंखे महाविद्यालय कराड येथे, बाळासाहेब देसाई कॉलेज पाटण, अग्रणी महाविद्यालय योजने अंतर्गत "विकसित भारतासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे योगदान" या विषयावरती झालेल्या कार्यशाळेत बोलताना सत्र एकचे साधन व्यक्ती डॉ. अभयकुमार पाटील म्हणाले, विकसित भारताच्या उभारणीसाठी राष्ट्रीय सेवा योजना हे उत्कृष्ट साधन आहे. महात्मा गांधींच्या जन्मशताब्दी वर्षाच्या निमित्ताने 1969 ला एनसीसी ला पर्याय म्हणून महाविद्यालयात एनएसएस निर्माण झाले. युवकांना राष्ट्रकार्याकडे वळवणे हा हेतू होता. आज विकसित भारताची उभारणी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजना विभागातील युवक युवती शेती, आरोग्य, विज्ञान, शासकीय योजना इत्यादींची जनजागृती चांगल्या प्रकारे करू शकतात. पर्यावरण संवर्धन, वाढते प्रदूषण इत्यादी बाबी वरती विविध उपक्रम राबवून समस्या सोडविण्यास मदत होईल. या सर्व बाबीसाठी युवकांच्यात निर्णय क्षमता हवी. रूढी परंपराच्या बंधनातून मुक्त होऊन सर्वधर्मसमभावाची भावना जागृत केली पाहिजे.
कार्यशाळेच्या सत्र दोन चे साधन व्यक्ती डॉ. अभय जायभाये होते आपल्या मार्गदर्शनात ते म्हणाले, जगात सर्वाधिक युवकांची संख्या असलेला देश भारत आहे. युवक समाजाला दिशा देऊ शकतो आणि तो क्रांती करू शकतो. त्यामुळे देशात विकास हवा असेल तर राष्ट्रीय सेवा योजनेतील तरुणांनी महत्त्वाची भूमिका बजावली पाहिजे. समाजसेवेसारखे महत्त्वाचे साधन व संधी आपल्या हातात आहे.
कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. डॉ. सतीश घाटगे होते आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनात ते म्हणाले, विकसित भारत निर्माण करायचा असेल तर सर्वप्रथम समाजात असलेल्या सामाजिक समस्या सोडवणे महत्त्वाचे आहे. सर्वधर्मसमभाव, अंधश्रद्धा निर्मूलन याचबरोबर स्वयंसेवकांनी चिकित्सक असले पाहिजे. सत्य व असत्य यातला फरक ओळखता आला पाहिजे. मिळालेल्या ज्ञान विज्ञानाला सुसंस्काराची जोड असेल तर नक्कीच भारत येत्या काळात विकसित होईल.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक अग्रणी विभाग प्रमुख प्रा. विश्वनाथ सुतार यांनी केले. पाहुण्यांचा परिचय कार्यक्रमाधिकारी प्रा. रघुनाथ गवळी यांनी केला. आभार कार्यक्रमाधिकारी डॉ. मारुती सूर्यवंशी यांनी व्यक्त केले तर सूत्रसंचालन डॉ. शितल गायकवाड यांनी केले. कार्यक्रमासाठी अग्रणी महाविद्यालय अंतर्गत असलेल्या विविध महाविद्यालयाचे प्राध्यापक, विद्यार्थी,विद्यार्थिनी उपस्थितहोते.महाविद्यालयातील सर्व गुरुदेव कार्यकर्ते या कार्यक्रमासाठी बहुसंख्येने उपस्थित होते.

Comments
Post a Comment