महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत रानभाजी महोत्सव
महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत रानभाजी महोत्सव.
शिराळा- प्रतिनिधी (आनंदा सुतार )
रानभाज्या व सेंद्रिय पद्धतीने पिकवलेल्या भाज्या, फळे व अन्नधान्याचा दैनंदिन आहारात वापर गरजेचे बनले आहे, असे प्रतिपादन आमदार मानसिंगराव नाईक यांनी केले.
शिराळा येथील मध्यवर्ती प्रशाकीय इमारतीत आज ता. ९ महाराष्ट्र शासनाच्या कृषी विभागामार्फत रानभाजी महोत्सव झाला. त्याच्या उदघाटन प्रसंगी ते बोलत होते. तहसीलदार गणेश शिंदे, तालुक्याच्या सभापती वैशालीताई माने प्रमुख उपस्थितीत होते.
आमदार नाईक म्हणाले, रानभाज्या नैसर्गिक वाढलेल्या व विषमुक्त असतात. रानभाजी व सेंद्रिय भाजी आरोग्यासाठी उत्तम असते. रासायनिक खते व किटकनाशके वापरलेल्या भाज्यामुळे आरोग्यावर दुष्परिणाम होत आहेत. शिराळा तालुका डोंगराळ आहे. रानभाज्या मुबलक प्रमाणात उपलब्ध आहेत. अन्नधान्य, फळे, भाजीपाला संकरित व रासानिक औषध वापरून पिकवली जात आहेत. त्यामुळे कॅन्सर, हृदयविकार, रक्तदाब, मधुमेह, मुत्रपिंडाचे आदी रुग्ण वाढताना दिसत आहे. गल्लोगल्ली दवाखाने व डॉक्टर झालेत. पूर्वी अशी परिस्थिती नव्हती. रानभाजी ताटातून गेल्या, आणि रोगराईने शरीरात प्रवेश केला आहे. हे बदलण्यासाठी सकस अन्नधान्य, भाजीपाला, फळे पिकवणे, गगरजेचे आहे. ही जबाबदारी जेवढी शेतकऱ्याची, तेवढीच ग्राहकांची,व सुजाण नागरिकांची आहे.
प्रारंभी आमदार नाईक यांच्या हस्ते रानभाजी महोत्सवाचे फित कापून उद्घाटन झाले. उपस्थित मान्यवरांनी महोत्सवात ठेवण्यात आलेल्या करटोली, अंबाडी, घोळू, पातर, टाकळा, अळू, बिब्बा, शेवगा, चवळी, लाल माठ, तांदळ, चवळी, रुई, पिंपळ, तोंदली, गुळवेल, मायाळू, केना, बांबू कोंब आदी भाज्यांची पहाणी केली. तालुका कृषी अधिकारी जी. एस. पाटील यांनी स्वागत व प्रस्ताविक केले. कोकरूड मंडल कृषी अधिकारी ए. एन. शिंदे यांनी मान्यवरांचा सत्कार केला. या वेळी शिराळा मंडल कृषी एस. टी. घारगे, रामचंद्र पाटील, प्रणव हसबनिस, संदीप पाटील, शेतकरी आदी उपस्थित होते.

Comments
Post a Comment