प्रभाकर केंगार यांना आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार प्रदान.
प्रभाकर केंगार यांना आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार प्रदान.
कार्वे - प्रतिनिधी.
वडगांव हवेली (ता. कराड) ग्रामपंचायतीचे ग्रामविकास अधिकारी प्रभाकर केंगार यांना सातारा जिल्हा परिषदेच्यावतीने आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्काराने नुकतेच गौरविण्यात आले. सहकारमंत्री तथा पालकमंत्री ना. बाळासाहेब पाटील यांच्या हस्ते त्यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अर्चना वाघमळे, कराड पंचायत समितीचे सभापती प्रणव ताटे, उपसभापती रमेश देशमुख, गटविकास अधिकारी शशिकांत शिंदे यांच्यासह पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती.
केंगार यांनी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून केंद्र व राज्य शासनाच्या महत्वाकांक्षी योजनांची अंमलबजावणी प्रभावीपणे केली असून, कार्यतत्परता, स्वयंशिस्त, सहकार्य वृत्ती व उपक्रमशीलता याद्वारे गौरवास्पद कामगिरी केली आहे. योगदानाची दखल घेऊन त्यांना आदर्श ग्रामविकास अधिकारी पुरस्कार देण्यात आला.ग्रामविकास अधिकारी प्रभाकर केंगार व पत्नी प्रियांका केंगार यांनी पालकमंत्री ना. पाटील यांच्या हस्ते पुरस्काराचे प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह तसेच सत्कार स्वीकारला.
केंगार हे सद्या वडगाव हवेली व कापील येथील ग्रामपंचायतीचा कार्यभार सांभाळत आहेत. त्यांनी ग्रामपंचायत प्रशासनाच्या सहकार्याने केलेल्या कार्याची दखल घेत याआधी कराड पंचायत समिती व जिल्हा परिषद च्या वतीने ग्रामपंचायतीला संत गाडगे बाबा ग्रामस्वछता पुरस्कार, जिल्हास्तरीय घणकचरा व्यवस्थापन पुरस्कार, स्मार्ट ग्राम पुरस्कार, गौरव ग्रामसभा पुरस्कार जिल्ह्यात प्रथम व राज्यपातळी साठी नामांकन असे अनेक पुरस्कार मिळाले आहेत. तसेच शासनाच्या बिहार पॅटर्न वृक्ष लागवड व गांडूळ खत प्रकल्प या कामांची यशस्वी जोपासना केली आहे.यामध्ये त्यांचा मोलाचा वाटा आहे. जिल्हा परिषदेकडून मिळालेल्या पुरस्काराबद्दल त्यांचे विविध क्षेत्रातील मान्यवर व पदाधिकाऱ्यांकडून अभिनंदन होत आहे.
-------------------
Comments
Post a Comment