कृष्णा कारखान्याचे ऐतिहासिक विक्रमी गाळप एकाच दिवसात 9200 मे. टन ऊसाचे गाळप करून केला नवा उच्चांक.

 

कृष्णा कारखान्याचे ऐतिहासिक विक्रमी गाळप  एकाच दिवसात 9200 मे. टन ऊसाचे गाळप करून केला नवा उच्चांक.


शिवनगर, ता. 15 : येथील यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याने या गळीत हंगामात 14 डिसेंबर रोजी 9200 मेट्रिक टन इतके सर्वोच्च गाळप करत, कारखान्याच्या इतिहासातील एका दिवसात सर्वाधिक गाळप करण्याचा एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. कारखान्याचे चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली या संचालक मंडळाच्या कारर्किदीत एका दिवसात सर्वाधिक गाळप करण्याचा विक्रम सहाव्यांदा केला असून, सोमवारी कारखान्याच्या 61 वर्षाच्या इतिहासात सर्वोच्च गाळप झाल्याने ‘कृष्णा’च्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला गेला आहे.


कृष्णा कारखान्याने या हंगामात आजअखेर प्रतिदिन सरासरी 8000 मेट्रिक टनाहून अधिक क्षमतेने 2 लाख 70 हजार मे. टन ऊसाचे गाळप केले असून, 3 लाख 10 हजार क्विंटल साखर उत्पादित केली आहे. दिवसाचा साखर उतारा 12.11 टक्के असून, सरासरी साखर उतारा 11.21 टक्के इतका आहे.   


चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखाली यापूर्वी विविध हंगामात तब्बल 5 वेळा एका दिवसात सर्वोच्च गाळपाचा विक्रम झाला आहे. तसेच कृष्णेच्या शेतकर्‍यांनी राज्यात सर्वाधिक ऊस उत्पादनाचे राज्यस्तरीय पुरस्कार पटकावले आहेत. चेअरमन डॉ. सुरेश भोसले यांच्या मार्गदर्शनाखालील संचालक मंडळाने गेल्या पाच वर्षात कारखाना कामकाजात पारदर्शकता आणली आहे. कारखान्यास आर्थिक शिस्त लावली आहे. कारखान्याच्या शेतकी विभागाने नियोजनबध्द तोडणी यंत्रणा राबविली आहे. यांत्रिकीकरणावर भर देत कारखान्याची तोडणी यंत्रणा हार्वेस्टर मशिनने सुसज्ज केल्याने, शेतकर्‍यांना वेळेत तोड मिळत आहे.


तसेच मोफत साखर, शेतकरी संवाद मेळावे, वाकुर्डे योजनेसाठी अर्थसहाय्य व 81-19 योजनेत कृष्णा कारखान्याच्या सभासदांचा समावेश करावा यासाठी प्रयत्न व त्यास यश, सुसज्ज कृषि महाविद्यालय, द्रवरूप जिवाणू खत प्रकल्प उभारणी, जयवंत आदर्श कृषि योजना, एकरी 100 टन उत्पादन ऊसविकास योजना, कारखाना व डिस्टलरीचे आधुनिकीकरण, कर्मचारी कल्याण योजनेची प्रभावी अंमलबजावणी, यासारखे सभासद हिताचे निर्णय कारखाना संचालक मंडळाने राबविले आहेत. विक्रमी गाळप केल्याबद्दल कारखान्याच्या संचालक मंडळाकडून अधिकारी व कर्मचारी वर्गाचे अभिनंदन करण्यात आले.

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .