माणसातील तपास्वी- संत गाडगेबाबा.

 माणसातील तपास्वी- संत गाडगेबाबा

        


   ब्यूरो रीपोर्ट  - भिमराव परघरमोल.

  डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापुरुषांची व्याख्या करताना म्हणतात की, ' महापुरुषाला समाजाच्या गतिमानतेबद्दल कळकळ वाटली पाहिजे आणि त्याने समाजाच्या शुद्धीकरणाचे व प्रशासकांचे काम केलेच पाहिजे. ' त्यांच्या या व्याख्येनुसार संत गाडगेबाबांच्या व्यक्तिमत्वाकडे तटस्थ भूमिकेतून पाहिले तर ते महापुरुषांच्या व तुकाराम महाराजांच्या विचारातील ' देव ' पदाच्या पलीकडे म्हणजे संतपदाला पोहोचलेले होते. संत त्यांनाच म्हटले जाते जे माणसातील तपस्वी असतात. आज समाजातील अनेक लोक स्वतःला संत ही उपाधी लावून घेताना दिसतात. परंतु माणसातील तपस्वी मात्र गाडगेबाबा नंतर कोणीही होऊ शकले नाही.  तपस्वी म्हणजे काय? तर मानवी मोह पाशातून मुक्त होऊन छडविकारांवर विजय मिळवून स्वतःला परमेश्वराच्या समिप जाण्याची किंवा जन्म-मरणाच्या फेऱ्यातून मुक्त होण्याच्या इच्छेने स्वतःला एकांतवासात झोकून देऊन मानवी समूहासोबत कायमचे नाते न ठेवणे. परंतु गाडगेबाबा निरपेक्ष तपस्वी होते. त्यांनी समाजासोबत कधीच नातं तोडलं नाही. स्वतःला मानवी मोहपाशातून मुक्त करण्यासाठी छडविकारांवर विजय मिळण्यासाठी मानवी जीवन व त्यांचे प्रश्न समजून घेऊन त्यावर उपाय योजना शोधण्यासाठी समाजामध्ये रात्रंदिवस कष्ट केले.

          अशा या माणसातील तपस्वी गाडगेबाबांचा जन्म २३ फेब्रुवारी १८७६ शेणगाव तालुका मूर्तिजापुर जिल्हा अमरावती येथील सुबत्ता असणाऱ्या घरांमध्ये झाला होता. परंतु त्यांचे वडील झिंगराजी जानोरकर हे जात पंचायतीच्या रूढी परंपरा पाळताना व्यसनाच्या आहारी गेल्यामुळे, सधन कुटुंब केंव्हा निर्धन झालं हे लक्षातच आलं नाही. सोबतच त्यांना विविध आजारांनी ग्रासले. मृत्यू समीप असताना का होईना परंतु ही अवदसा का प्राप्त झाली याची कारणमीमांसा त्यांना कळली. म्हणून त्यांनी आपली पत्नी सखुबाईला जवळ बोलावून सांगितलं की सामाजिक, धार्मिक  चालीरीती रूढी-परंपरा (देव, दारू, मटण) यामुळे आमच्या कुटुंबाची दुर्दशा झाली. त्यापासून माझा मुलगा ' डेबू ' हा पूर्णपणे अलिप्त असला पाहिजे याचं वचन घेऊन त्यांनी शेवटचा श्वास घेतला. सखूबाईने सुद्धा मनामध्ये कोणतीही भीती न बाळगता घरातील तेहातीस कोटींच्या प्रतिनिधींना भुलेश्वरी नदीमध्ये जलसमाधी देऊन, त्यांच्याकडे कायमचीच पाठ फिरवली. वडिलांच्या मृत्यूचा बालमनावर झालेला परिणाम व आईचे पुरोगामी संस्कार यामुळे डेबुजींचं व्यक्तिमत्त्व अंतर्बाह्य बदलून गेलं होतं. म्हणूनच तर बालवयातच त्यांचे विविध जातीचे एकाच ताटात जेवण करू शकतील असे जिवाभावाचे मित्र होते. त्यांना समाजातील जातीयता व उच्च-निच्चता याबद्दल  प्रचंड चीड  होती. म्हणून गावातील सार्वजनिक सहभोजनामध्ये डेबुजीचा आग्रह असूनही अस्पृश्य व दुर्बल घटकांना स्थान नसल्यामुळे स्वतःची पदरमोड करून त्यांनी सर्वांना जेवण दिलं होतं. 

         गाडगेबाबांनी वैराग्य पत्करल्यानंतर स्वतःमधील अहंकार गळून  मानवी मनाच्या विकारांवर विजय मिळवण्यासाठी व समाज व्यवस्थेची रचना तथा त्यांचे प्रश्न समजून घेण्यासाठी संपूर्ण महाराष्ट्रभर भ्रमंती केली. ती एक त्यांची बारा वर्षांची खडतर तपश्चर्याच होती.त्यामध्ये त्यांच्यावर अनेक संकटे आली. जंगली श्वापदांचा सामना करावा लागला. अनेक उपवास घडले. जागोजागी अपमान झाला. भ्रमंतीमुळे अंगातील कपड्यांच्या चिंध्या चिंध्या झाल्या म्हणून अनेकांनी त्यांना वेडा समजून त्यांची हेळसांड केली. लहान मुलांनी दगड मारून जखमी केले, तर काही ठिकाणी चोर दरोडेखोर समजून लोकांच्या संतापालाही सामोरे जावे लागले. 

           बारा वर्षांच्या भ्रमंती मधून गाडगे बाबांनी समाजव्यवस्थेचे, तिच्या रचनेचे जवळून निरीक्षण केले. त्यामुळे त्यामधील बऱ्याच गोष्टी ज्या मानवजातीला काळीमा फासणाऱ्या, समाजधारणेसाठी बाधा आणणाऱ्या तथा माणसाच्या विकासातील अवरोध ठरणाऱ्या असल्याचे त्यांच्या लक्षात आले. जसे जातीयता, अस्पृश्यता, अज्ञान, शिक्षणाचा अभाव, अंधश्रद्धा, बळी प्रथा, देवभोळेपणा, भीती, भूत, भानामती, धर्माच्या नावाखाली होणारी फसवणूक, कर्ज काढून यात्रा करणे, नवस फेडणे इत्यादी.

            ज्याप्रमाणे बुद्धाला संबोधी प्राप्त झाल्यानंतर त्यांनी त्यांच्या विचारधारेचा प्रचार-प्रसार प्रवचनाच्या माध्यमातून करायला सुरुवात केली व समाजामध्ये मूलगामी अमुलाग्र बदल घडून आणला. त्याचप्रमाणे समाज विकासाच्या आड येणाऱ्या प्रश्नांना समजून घेऊन गाडगेबाबा थांबले नाही, तर समाजातील वैगुण्यावर बोट ठेवून त्यामध्ये सुधारणा घडवून आणण्यासाठी त्यांनी मनोरंजनातून  प्रबोधन करणार्‍या कीर्तनाचा मार्ग स्वीकारला.

            गाडगेबाबांच्या कीर्तनामध्ये खूप काही मोठे अवडंबर नसायचे. दिवसभर संपूर्ण गाव झाडून स्वच्छ करून गावातील घाण साफ करावी व रात्री कीर्तनाच्या माध्यमातून लोकांच्या मेंदूतील घाणरुपी कूप्रथांवर शब्दांचे वार करावे. ही त्यांची पद्धत होती. हातात दोन दगड घेऊन अतिशय सुरेल आवाजात भजन म्हणत चावडीवर उभे राहावे. त्यामुळे अनोळखी लोकांमध्ये कुतूहल निर्माण होऊन सुरुवातीला दुर्लक्ष करणाऱ्या लोकांनी स्वतः किर्तन भजनाचे साहित्य गोळा करावे व बघता बघता संपूर्ण गाव कीर्तनामध्ये सहभागी होवून तल्लीन व्हावा. असे अनेक गाव खेडी घडत होते.

           त्यांच्या कीर्तनामध्ये संत कबीराचे दोहे व संत तुकाराम महाराजांच्या  अभंगांना खूप मोठे स्थान होते. कीर्तनाच्या माध्यमातून ते देव, संतवाणी, तीर्थयात्रा, अभिमान, सत्यनारायण पूजा, गणपती पूजा, देव पूजा, देशसेवा, संतश्रेष्ठता, जातीभेद, अंधश्रद्धा, शिक्षण, अहिंसा, गरिबी, दारूची नशा, डॉ. बाबासाहेब आंबेडकर व इतर काही महापुरुषांच्या कार्यावर प्रकाश टाकत असत. 

           संत गाडगेबाबा कीर्तनाच्या माध्यमातून फक्त जनजागृती करून थांबले नाहीत तर त्यांनी स्वतः समाजासाठी अनेक कृती कार्यक्रम राबवून ते बोलके नाही, तर कर्ते सुधारक ठरले. त्यांनी अंधश्रद्धेवर कोरडे ओढण्यात धन्यता मानली नाही, तर त्याविरुद्ध प्रत्यक्ष मोहीम उभी केली. सावकारी पाशातून शेतकऱ्यांची सुटका होण्यासाठी त्यांना शिकवण दिली. अस्पृश्यता व पशुहत्ये विरुद्ध आंदोलन, अंध अपंगांसाठी अन्नक्षेत्र, अशिक्षित कार्यकर्त्यांना रोजगार मिळण्यासाठी तांत्रिक शिक्षणाची सोय, तीर्थक्षेत्री अस्पृश्यांसाठी धर्मशाळा, संतती नियमांचे महत्त्व समजावून सांगणे, व्यसन विरोधी लढा, कुष्ठरोग्यांची सेवा, मुंबईत आजारी व्यक्तींच्या नातलगांसाठी धर्मशाळा, वृद्ध गाई-बैलांना अभय देण्यासाठी गोरक्षण संस्था. इत्यादी मूलभूत कार्य करून त्यांनी अवघा महाराष्ट्र ढवळून काढत  मानवजातीची सेवा करण्यात वयाची पन्नास वर्षे खर्ची घातली. शेवटी २० डिसेंबर १९५६ रोजी त्यांचे महापरिनिर्वाण झाले. अशा थोर माणसातील तपस्वी संतांना त्यांच्या स्मृतिदिनी कोटी कोटी प्रणाम!......

            

            भिमराव परघरमोल

         व्याख्याता तथा अभ्यासक     

        फुले-आंबेडकरी विचारधारा    

             तेल्हारा जि. अकोला

             मो.९६०४०५६१०४

Comments

Post a Comment

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .