सरकारी शाळा व शिक्षकांप्रती दृष्टीकोन बदलणार की नाही?

 

सरकारी शाळा व शिक्षकांप्रती दृष्टीकोन बदलणार की नाही?

                


 अकोला - भिमराव परघरमोल.

          सोलापूर जिल्ह्यातील परतेवाडी येथील वर्ग १ ते ४ जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेतील शिक्षक रणजितसिंह डिसले यांनी , ' युनेस्को व वार्की फौंडेशन ' यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या ' ग्लोबल टीचर अवार्ड ' या शिक्षण क्षेत्रातील नोबेल सदृश्य सर्वोच्च पुरस्कारावर आपलं नाव कोरलं. ही बातमी मीडियामध्ये झळकताच  अनेकांच्या भुवया उंचावल्या. त्याला कारणही तसंच होतं १४० देशांमधून बारा हजार लोकांनी पुरस्कारासाठी नामांकन दाखल केलं असताना त्या सर्वांना मागे टाकत गुरुजींनी बाजी मारली. फक्त बाजीच मारली नाही, तर पुरस्कार व देणाऱ्या संस्थांचाही सन्मान वाढेल अशी गुरुजींच्या वागणुकीतील विनम्र  उदारता. सात कोटींचा पुरस्कार! एवढी कमाई तथा एवढ्या रुपयांचं स्वप्न पाहणे सुद्धा शिक्षकांसाठी पाप किंवा गुन्हा ठरू शकतो. तरीही डिसले गुरुजींचे हे स्वप्न प्रत्यक्षात साकार झालं होतं. परंतु पुरस्काराने सन्मानित झालेले गुरुजी जगातील महान हृदयी दानशूरांच्या पंक्तीत सन्मानाने जाऊन बसले. त्यांना मिळालेल्या पुरस्काराच्या रकमेपैकी अर्धी रक्कम स्पर्धेत, त्यांच्यासह असणाऱ्या दहापैकी नऊ शिक्षकांना दिली व उर्वरित रक्कम शिक्षण क्षेत्रात भरीव संशोधन होण्यासाठी जाहीर केली. तेंव्हा शिक्षकांना कंजूस म्हणून हिनवीणाऱ्यांना चपराक बसली.  त्यामुळे शिक्षणाचं पवित्र कार्य करणाऱ्या समस्त शिक्षकांची मान गर्वाने उंचावली.

         डिसले गुरुजींचे उदार अंतकरण, मनाचा मोठेपणा पाहता मदर तेरेसांची आठवण झाल्यावाचून राहत नाही. त्यांनी आपली संपूर्ण हयात दीनदलित, दुःखीकष्टी, रोगी, रंजल्या-गांजल्यांची सेवा करण्यात घालवली. त्यामुळे त्यांना १९७९ साली शांततेचे नोबेल प्रदान करण्यात आले. नोबेल प्रदान समयी उपस्थितांना शाही मेजवानी मिळते. मदर तेरेसांनी आयोजकांची भेट घेऊन ती रद्द करून त्या मेजवानीचे पैसे आपणास मिळावे अशी याचना केली. जेणेकरून त्या पैशात गरजवंताच्या मुखात दोन घास सुखाने भरवता येतील.  त्यांनी त्यांची विनंती मान्य करत संपूर्ण पैसा त्यांना दिला. सोबत उपस्थितांनी आपआपल्या खिशात हात घातला. एक भरीव रक्कम त्यांच्या पदरात पडली.

          समाजातील काही लोक शिक्षकांना कमी लेखण्यात तथा त्यांना हिणवण्यात मोठी धन्यता मानतात. तर काही आजही त्यांना पवित्र वागणूक देताना दिसतात. कंजुषी आणि काटकसर या दोन शब्दांमधील फरक समजावत, अनेक पिढ्यांनी शिक्षकांकडून धडे घेतलेले आहेत.  सहाजिकच या शब्दाचा अर्थ सांगताना गुरुजींनी आपली हयात खर्ची घातलेली असते. म्हणून तो त्यांच्या अंगवळणी पडलेला असतो. एवढेच नव्हे तर जे संस्कार, जी मूल्य मुलांमध्ये रुजवून राष्ट्रनिर्मितीसाठी नवसमाजाची उभारणी शिक्षक करत असतात. ती मुल्य, ते संस्कार शिक्षकांमध्ये असणे अत्यंत गरजेचे असते. कारण शिक्षक हा समाजाचा आदर्श रुपी आरसा असतो. कंजूषी म्हणजे काय? तर आपल्या दैनंदिन गरजांवर खर्च न करता पैसा वाचवणे. काटकसर म्हणजे, चैनीच्या गोष्टीवरील अतिरिक्त खर्च टाळणे. उदा. जवळच्या एखाद्या ठिकाणी मोटरसायकल चा उपयोग न करता चालत जाणे जेणेकरून(पेट्रोलजन्य) राष्ट्रीय संपत्तीचा अपव्यय होणार नाही. शरीराला व्यायाम मिळून थोडी पैशांची बचतही होईल. या छोट्या-छोट्या कटकासरिंमुळे अनेक फायदे होतात. त्यालाही काही लोक कंजूषपणा म्हणत असतील, तर त्यांना पुन्हा शिक्षकांकडे जाऊन धडे घेण्याची गरज आहे असेच म्हणावे लागेल. जगाच्या तुलनेत सरासरी अधिक आयुष्यमान जापानी लोकांचे आहे. त्याला कारण म्हणजे सार्वजनिक वाहनांचा भरपूर वापर. त्यामुळे त्यांना एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी चालत जावे लागते.

         यावर्षी नोव्हेंबर २०२०  मध्ये रवींद्र तहकिक या लोकपत्रच्या संपादकाने शिक्षकांविषयी अतिशय खालच्या व अश्लाघ्य भाषेत गरळ ओकली होती. तर काही दिवसांपूर्वी नामदेवराव जाधवांनी आपल्या व्याख्यानांमध्ये शिक्षकांना मिळणाऱ्या वेतनावर कडाडून हल्ला चढवला होता. त्याचप्रमाणे योगगुरु श्री श्री रविशंकर यांनी सरकारी शाळा ह्या आतंकवाद्यांची निर्मिती करतात. शिक्षक आतंकवादाचे निर्माते आहेत, म्हणून सर्व सरकारी शाळा बंद करून त्यांचे खाजगीकरण केले पाहिजे असे म्हटले होते.

              वरील तिन्ही लोक हे समाजव्यवस्थेमध्ये प्रतिष्ठित असून प्रतिनिधित्व करणारे आहेत. त्यामुळे आपण काय बोलतो आहोत याची जाणीव त्यांना नाही असे नाही. म्हणून त्यांचे वक्तव्य सहज  घेणे शक्य नाही. रवींद्र तहकिक हे एका दैनिकाचे संपादक आहेत. त्या दैनिकाच्या मुखपृष्ठावर ' अग्रलेखाचा बादशहा ' असाही उल्लेख वाचायला मिळतो. परंतु दि. ८ नोव्हेंबर २०२० रोजीच्या अग्रलेखा मध्ये त्यांनी वापरलेले शब्द मास्तरड्यानो, नोकरी म्हणजे बापाची पेंड, खायला काळ आणि भुईला भार, कपी पुत्रांनो  (कपि म्हणजे माकड) तुमचा पार्श्वभाग दुखतो का? अशा एक ना अनेक शब्द तथा वाक्यांवरून त्यांचा संपादकीय सुसंस्कृतपणा दिसून आला. त्यामुळे त्यांना शिक्षकांच्या रोषाला बळी पडावे लागले. एवढे तरी बरे की, महिला शिक्षीकांनी त्यांच्यावर विनयभंगाचा, मागासवर्गीय शिक्षकांनी  ॲट्रॉसिटी गुन्हा दाखल केला नाही.

           नामदेवराव जाधव हे व्याख्याते असल्यामुळे, व्याख्यान प्रभावी होवून श्रोत्यांना रिझविण्यासाठी त्यांनी शिक्षकांनाच लक्ष केलं. कारण प्रत्येकाला शिक्षक हाच एकमेव गरीब प्राणी आहे असे वाटते. त्यामुळे ' मुकी बिचारी कुणीही हाकावी ' याप्रमाणे जाधवांची मानसिकता दिसून येते.

        योगगुरु श्री श्री रविशंकर यांचा हेतू या दोघांपेक्षा नामनिराळा असल्याचे दिसते ते शाळांना आतंकवादी निर्मितीचे केंद्र तर शिक्षकांना निर्माते म्हणतात. ते एवढ्यावरच थांबत नाही तर शाळांना बंद करून त्यांचे खाजगीकरण करण्याचा सल्लाही  द्यायला ते विसरत नाहीत.  यावरून असे वाटण्यास वाव आहे की, ते मनुस्मृतीचे समर्थक असावेत.  मनुस्मृती बहुजन समाजाला(एससी, एसटी, ओबीसी, एनटी, डीएनटी, व्हीजेएनटी, एसबीसी) शिक्षणाचे हक्क-अधिकार नाकारते. म्हणून शिक्षण भांडवलदारांच्या घशात घालून महागडे व्हावे व बहुजन समाजाने त्यापासून वंचित राहावे, अशी त्यांची प्रामाणिक इच्छा दिसते. म्हणूनच त्यांचं पोटातलं ओठात आलं. परंतु दुर्दैव! एवढं भयानक व राष्ट्रविरोधी वक्तव्य असूनही त्यांना हव्या त्या प्रमाणात विरोध झाला नाही. 

         आज कोरोना महामारीच्या काळात शिक्षकांनी कोणतेही प्रशिक्षण किंवा सुरक्षाकवच नसताना काटेकोर आपले कर्तव्य बजावले आहे. त्यामुळे अनेकांना मृत्यूला कवटाळणे भाग पडले. जिल्ह्याच्या सीमांवर तथा अनेक ठिकाणी नाकेबंदी करत शिक्षकांनी कित्येक रात्री जागून काढल्या. कोरोनासंबंधी विविध  सर्वेक्षण केले. स्वस्त धान्य दुकानांवर हजेरी, मदिरा प्रेमींना शिस्त लावणे, हेही कार्य त्यांच्याकडेच होते. सोबत ऑनलाईन क्लासेस वर्क फ्रॉम होम  होतेच.

          हा झाला आपत्ती व्यवस्थापनाचा भाग. तो प्रत्येकाने आपापल्या परीने पार पाडणे  प्रत्येकाचे कर्तव्यच आहे. परंतु एरवीही शिक्षकांना शासनाने सांगितलेली शेकडो कामे करावीच लागतात. म्हणूनच सर्वोच्च न्यायालय शिक्षकांच्या कार्याला राष्ट्र निर्मितीचे कार्य म्हणून त्यांचा गौरव करते. ही बाब प्रत्येक समाज घटकाने लक्षात ठेवावी एवढीच अपेक्षा !......

     

            भिमराव परघरमोल
         व्याख्याता तथा अभ्यासक
        फुले आंबेडकरी विचारधारा
            तेल्हारा जि. अकोला
             मो.९६०४०५६१०४

Comments

Popular posts from this blog

येळगाव जिल्हा परिषद गटातील बांधकाम कामगारांना संचाचे केले वाटप.

महाराजस्व समाधान शिबीर संतकृपा शिक्षण संस्थेत उत्साहात संपन्न.

सोनवडे ग्रामपंचायतीला आरोग्यविषयक कार्याचा विसर .